मुंबई हादरली! ट्रेनमध्ये चढू न दिल्याचा राग दुसऱ्यांवर काढला, १५ मिनिटांत दोघांना केलं ठार
दक्षिण मुंबईत १५ मिनिटांत दोन जणांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुरेश शंकर गौडा याला पोलिसांनी अटक केली आहे. ४० वर्षीय आरोपी गौडा याने रागाच्या भरात हा गुन्हा केल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले. ट्रेनमधील काही लोकांमुळे त्याला भायखळा स्टेशनवर उतरावे लागले. भायखळा आणि जेजे मार्ग दरम्यान बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून आम्ही गौडाच्या हालचाली पाहिल्या, असे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो बदलापूर-सीएसटी गाडीतून खाली उतरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौडा याने २३ ऑक्टोबर रोजी भायखळा फ्रूट मार्केट आणि जेजे मार्गाच्या फूटपाथवर दोन अज्ञात व्यक्तींची हत्या केली होती. त्याने पहिला खून भायखळा येथे सायंकाळी ७.५० वाजता केला, तर दुसरा खून रात्री ८.०५ वाजता केला.
खरंतर, गौडाही फूटपाथवर राहतो. गौडा हा कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले असून, तो २१ वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. आधी ऑटोरिक्षा चालवायचा. गौडा याला २००३ मध्ये एका प्रवाशाला लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.