…म्हणून त्याने पत्नीच्या चेहऱ्यावरच टाकलं केमिकल; पोलिसांकडून शोध सुरू


हायलाइट्स:

  • पत्नीच्या चेहऱ्यावर लादी पुसण्याचे केमिकल टाकलं
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती फरार
  • पोलिसांकडून शोध सुरू

मनोज जालनावाला | नवी मुंबई :

पनवेल भागात राहणाऱ्या पवन पाटील (वय ४०) नामक व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर लादी पुसण्याचे केमिकल टाकून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपीच्या पत्नीच्या डोळ्याला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

आरोपी पवन पाटील हा पनवेल भागात राहाण्यास असून त्याचा आपल्या पत्नीसोबत नेहमी वाद होत असल्याने या भांडणाला वैतागून त्याची पत्नी मागील वर्षभरापासून विभक्त होऊन मुलासह पनवेलमध्ये भावाच्या घरी राहाण्यास गेली आहे. त्यानंतर देखील पवन पाटील हा पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे पवनविरोधात त्याच्या पत्नीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

नवी मुंबई हादरली; ऐन दिवाळीत घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

पवन पाटील याने १५ दिवसांपूर्वी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवले होते. त्यामुळे पवनच्या पत्नीने त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याच गोष्टीचा पवनला राग आल्याने तो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी पत्नीच्या घरी गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या सोबत प्लॅस्टिकच्या बाटलीत आणलेले लादी पुसण्याचे केमिकल पत्नीच्या तोंडावर टाकून त्या ठिकाणावरुन पलायन केले.

दरम्यान, या प्रकारामुळे पवनच्या पत्नीच्या डोळ्याला दुखापत झाल्याने तिला पनवेलमधील दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: