दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन :समाज संघटन व विचार जागृतीचे प्रभावी माध्यम..!
रत्नागिरी नैमित्तिक अधिवेशनातून कोकणातील जैन बांधवाप्रती सभेची वात्सल्यभावना..!!
सांगली / ज्ञानप्रवाह न्यूज – आज रविवार दि.४ जून २०२३ रोजी रावसाहेब पाटील दादा यांच्या अध्यक्षतेखाली कोकणात रत्नागिरी येथे सभेचे नैमित्तिक अधिवेशन संपन्न होत आहे. सभेचे हे कोकणातील पहिलेच अधिवेशन आहे. सभेच्या कोकण विभागाने या अधिवेशनाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही सभेचे व कोकण विभागाचे अभिनंदन करतो.हे अधिवेशन आयोजित करुन कोकण विभागातील जैनांना सामाजिक व धार्मिक कार्यासाठी एकत्र आणून त्यांच्यातील परस्पर मैत्रभाव व वात्सल्य भावना वृध्दीगंत करण्यासाठी सभेने उचलेले महत्वाचे पाऊल उचलले आहे.
तिसऱ्या शतकांपासून बाराव्या शतकापर्यंत जैन धर्माचे अनुयायी राजांनी संपूर्ण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रावर एक हजार वर्षाहून अधिक काळ राज्य करुन निर्विवाद प्रभुत्व प्रस्थापित केले होते. या काळात कोकणात जैन संस्कृती वैभवाच्या शिखरावर होती. शिलाहाराच्या तीन शाखा होत्या.. त्याच्या पहिल्या शाखेत ठाणे ते रायगड पर्यंत १४०० गावांचा समावेश होता व राजधानी ठाणे होती. बोर्डवे, पेंडूर व मालवण भागात आजही जैन मंदिरे आहेत. कोकणातील अनेक गावात जैन संस्कृतीचे अवशेष आढळून येतात. वीरगळ आणि जैन धोंडा ही कोकणातील जैन संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. कोकणा तील जैन संस्कृतीच्या समृद्धीच्या काळात अनेक ठिकाणी जैन मंदिरे, मानस्तंभ व गुहांची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे.कोकणातील जैन धर्म अनुयायांची संख्या व जैन धर्म प्रभाव ओसरु लागल्यानंतर अनेक जैन मंदिरांची पडझड होऊन जैन शिल्पवैभवाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रभाव कमी झाल्याचे दिसून येते.
जैन इतिहास संशोधक महावीर सांगलीकर यांच्या मते कोकणच्या शिलाहार आणि देशावरच्या यादव राजामध्ये अनेक वेळा लढाया झाल्या व त्या मध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ वीरगळ बनविण्यात आले. अनेक हिंदू मंदिरात नंदी आणि मानस्तंभ आहेत यावरुन आधी ती जैन मंदिरे होती नंतर ती शिवमंदिरे झाली याला कारण जैनांची कमी झालेली संख्या.
खारेपाटणचे मोहन कावळे म्हणतात, ‘एकेकाळी खारेपाटणच नव्हे तर संपूर्ण कोकणात जैन संस्कृती नांदली आहे.त्याचे अवशेष आजही कोकणातील अनेक गावात आढळून येतात. खारेपाटण ही जैन धर्मीय राजांची राजधानी होती. खारेपाटणच्या जैनवाडी कमानीलगत च्या काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच्या दिपमाळेलगत असलेल्या पुरातन मूर्ती या जैन संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. सुख नदी काठावरील पुरातन जैन मंदिराचा १९६६ व १९९७ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरात ११ व्या शतकातील श्री १००८ पार्श्वनाथ भगवानांची मनोज्ञ मूर्ती आहे. पुराचे पाणी साऱ्या गावात शिरते परंतु मंदिरात येत नाही अशी त्याची रचना आहे.
खारेपाटण पासून २४ किमी अंतरावर आदिनाथ डोंगर आहे. आजही या डोंगरावर शिकार केली जात नाही.वायंगणी येथे ऊसाच्या शेतात नांगरणी करताना भ. आदिनाथांची मूर्ती सापडली ती गावकऱ्यांनी जैन बांधवांना दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जंगलात वृक्षवल्लीच्या विळख्यातील पुरातन मूर्ती आहेत.जिल्ह्यातील पेंडूर, मसुरे, माणगाव व काळसे गावात जैन मूर्त्यांचे भग्नावशेष आढळून येतात. पेंडूर गावातील देऊळवाड्यातील परिसरात वृक्षवल्लींनी वेढलेल्या स्थितीत जैन मंदिर होते. नाना राऊळ यांच्या मते चिऱ्याचे बांधकाम असलेला गाभारा, सभामंडप व जोते आणि १४ मूर्त्या असा ऐतिहासिक ठेवा एक हजार वर्षांपूर्वीची मूर्तीकला व तत्कालीन जैन संस्कृतीचे दर्शन घडवते. मालवण येथे कृष्णाजी लक्ष्मण गरगट्टे यांनी त्यांच्या निवासस्थानी वरच्या मजल्यावर श्री १००८ भ. नेमिनाथ जिनमंदीर बांधले आहे.
आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ डॉ. विलास संगवे यांनी कोकण व जैन धर्म या विषयावर तीर्थंकर मासिकाच्या नोव्हेंबर १९७९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोकण – खारेपाटण विशेषांकात कोकण नाव कसे मिळाले, कोकणचा इतिहास, शिलाहाराच्या तीन शाखा, कोकणातील तुलनात्मक जैन संख्या इ. चे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. ते वाचनीय आहे. ठाण्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सरहद्दीपर्यत एके काळी वैभवाच्या शिखरावर राहिलेल्या जैन संस्कृतीला गतवैभव मिळवून देण्यासाठी डोर्ले बंधूची कामगिरी नोंदणीय आहे.
सभेच्या या नैमित्तिक अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा कोकणातील जैन संस्कृतीचा अभ्यास, कोकणवासिय जैन बांधवांचे सभेच्या एकाच छताखाली संघटन,त्यांच्या समस्या व उपाययोजना, जैन बांधवांमध्ये वात्सल्यभावना वृध्दीगंत करणे या कामी गती यावी व कोकणातील सारा जैन समाज सभेच्या प्रवाहात येण्याचे काम गतीमान होईल ही अपेक्षा गैर नाही. या निमित्ताने सबंध कोकणातील प्रत्येक गावातील जैन संस्कृती, मूर्त्या, मानस्तंभ, वीरगळ व जैन धोंड्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
जैन अनुयायांची संख्या कमी झाली त्या काळात जैन मंदिरे ही हिंदू मंदिरे झाली पण लोकांच्या आग्रहाखातर त्या मंदिरात जैन पाऊलखुणा जपण्यासाठी ‘जैन धोंडा’ ठेवण्याची मागणी मान्य झाले. अनेक ठिकाणी हे जैन धोंडे आहेत. कांही ठिकाणी जैन मूर्त्यांचे भग्नावशेष पुरातत्व खात्याने नेले आहेत. त्याचा शोध घेऊन त्यांचे जतन कार्य करावे लागेल. या अधिवेशनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक कामाला समाजाचे बळ मिळो हीच शुभभावना..!!

प्रा.एन.डी.बिरनाळे ,महामंत्री दक्षिण भारत जैन सभा महापरिवार