गोवा येथे आभासी माध्यमातून साजरा केला जागतिक मधमाशी दिवस

कृषी विज्ञान केंद्र,उत्तर गोवा आणि आयसीएआर – सीसीएआरआय,गोवा यांनी साजरा केला ‘जागतिक मधमाशी दिवस’World Bee Day celebrated through virtual in Goa
 गोवा, 21 MAY 2021, PIB Mumbai - आयसीएआर म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषद - कृषी विज्ञान केंद्र , उत्तर गोवा आणि आयसीएआर - केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था, गोवा यांनी 20 मे,2021 रोजी 'जागतिक मधमाशी दिवस' साजरा केला. गोव्यातील आयसीएआर-सीसीएआरआय यांनी 'मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून: ग्रामीण उत्पन्न वाढविणे' या एक दिवसीय कार्यक्रमाचे आभासी माध्यमातून आयोजन केले होते. उत्तर गोवा कृषी विज्ञान केंद्राचे प्रधान वैज्ञानिक आणि प्रमुख डॉ. बी. एल. काशीनाथ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. महाराष्ट्रातील पुणे येथील आयसीएआर-एटीएआरआयचे संचालक डॉ.लखन सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. 

 गोवा येथील आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ.परवीन कुमार यांनी 2018 पासून दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यासंदर्भातील पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की,स्लोव्हेनियातील मधुमक्षिका पालनाचे प्रवर्तक अँटोन जांसा यांची 20 मे रोजी येणारी जयंती जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यासाठीचा स्लोव्हेनियाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारला.

परिसंस्थेतील मधमाशा आणि इतर परागकणांची भूमिका जाणून घेणे हा जागतिक मधमाशी दिन साजरा करण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात 52 जण सहभागी झाले होते, यात शेतकरी, कृषी संचालनालयाचे अधिकारी, वैज्ञानिक, विषय तज्ञ, उत्तर गोवा कृषी विज्ञान केंद्र आणि आयसीएआर-सीसीएआरआय, गोवामधील तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश होता.

  महाराष्ट्रातील पुणे येथील आयसीएआर-एटीएआरआयचे संचालक डॉ.लखन सिंह यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मधमाशी पालनाचे महत्व विशद केले. मधमाशी पालनाच्या यशोगाथा त्यांनी मधुशक्तीचे उदाहरण देऊन सांगितल्या.मधुशक्ती हा पुण्यातील १०० महिलांनी पुढाकार घेऊन २ वर्षांपासून सुरू केलेला एक स्टार्ट-अप प्रकल्प आहे आणि मधाचे  ब्रँडिंग आणि विपणन तसेच  शेतीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचा प्रवेश आता एफपीओ मध्ये झाला आहे. कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या संकुलात मधमाशी पालन उपकरणांच्या माध्यमातून प्रशिक्षण देतात आणि मधमाशी पालन करण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवितात असे त्यांनी सांगितले. मधमाशा पाळणाऱ्यांचे संलग्न गट तयार करून त्यांना सामान्य प्रक्रिया आणि विपणनाची सुविधा पुरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

  श्रीमती शिशिरा उत्तप्पा यांचे ‘ग्रामीण उत्पन्न वाढविण्यासाठी वैज्ञानिकरित्या मधमाशांचे पालन’ या विषयावर आणि 'मेलिपोनिकल्चर- डंक नसलेल्या मधमाशांच्या माध्यमातून मधमाशी पालन' यासंदर्भात विषय तज्ञ (वनस्पती संरक्षण), श्री.एचआरसी प्रभू यांचे तांत्रिक सत्रात व्याख्यान झाले.या चर्चेतून मधमाशी पाळण्याच्या शास्त्रीय पद्धती, फायदे,भांडवलाची आवश्यकता,विपणन, नेटवर्किंग,ब्रँडिंग आणि मधमाशी पालनाच्या  यशोगाथा आणि मेलीपोनीकल्चर मधून जास्तीत जास्त उत्पन्न इत्यादी गोष्टीं मांडण्यात आल्या. 

शेवटी शेतकरी आणि वैज्ञानिकांशी परस्परसंवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: