दक्ष राहा, अगदी किरकोळ लक्षणां कडेही दुर्लक्ष करू नका म्युकोरमायकोसिस पासून सुरक्षित राहा

कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी स्टेरॉईड्स अजिबात वापरू नका- संचालक, एम्स
दक्ष राहा, अगदी किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका, म्युकोरमायकोसिसपासून सुरक्षित राहा
    मुंबई, 21 मे 2021,PIB Mumbai-

म्युकोरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग हा नवीन रोग नाही.अशा प्रकारचे संसर्ग कोरोनासाथी पूर्वीही आढळून येत असत. मात्र, त्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. आता कोविड-19 मुळे हा अतिशय दुर्मिळ व जीवावर बेतणारा बुरशीजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. कोविड-19 मधून बरे होत असलेल्या किंवा झालेल्या रुग्णांमध्ये सीएएम म्हणजे कोरोनाविषाणू रोगाशी संबंधित म्युकोरमायकोसिस होत असल्याचे लक्षात आले आहे.

कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी स्टेरॉईड्स अजिबात वापरू नका- संचालक, एम्स

गेल्या आठवड्यातील एका पत्रकार परिषदेत एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी या रोगाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल माहिती विशद केली. “पूर्वी म्युकोरमायकोसिस हा रोग सर्वसाधारणपणे डायबिटीस मेलिटस असणाऱ्या – म्हणजे ज्या रुग्णांमध्ये रक्तशर्करेची पातळी अत्यधिक आहे अशा- रुग्णांमध्ये आढळून येई. केमोथेरपी चालू असणारे कर्करोगाचे रुग्ण, अवयवरोपण झालेल्या व्यक्ती आणि इम्युनोसप्रेसंट्स (प्रतिकारशक्तीला दुर्बल करणारी औषधे) घेणाऱ्या व्यक्तींनाही हा रोग होत असे. परंतु आता कोविड-19 आणि त्यावरील उपचारांमुळे म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.एम्समध्येच या बुरशीजन्य संसर्गाचे 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ते सर्व कोविड पॉझिटिव्ह आहेत. अनेक राज्यांमध्ये 400 ते 500 रुग्ण आहेत, तेही सर्व कोविडचे रुग्ण आहेत.”

कोविड-19 मधून बरे होत असलेल्या/ झालेल्या रुग्णांवर याचा का व कसा परिणाम होतो?

कोविड-19 वर उपचार करताना वापरलेल्या औषधांमुळे लिंफोसाइट्स म्हणजे प्रतिकारशक्तीचा घटक असणाऱ्या श्वेतपेशींची संख्या कमी होऊ शकते. श्वेतपेशींचे तीन प्रकार असतात, त्यापैकी हा प्रकार रोगकारक जीवांपासून- जीवाणू, विषाणू, व परजीवी यांपासून- शरीराचे रक्षण करतो. या पेशी कमी झाल्यामुळे लिंफोपेनिया स्थिती उद्भवते व यामुळे बुरशीजन्य संसर्गाला कोविड -19 रुग्णाच्या शरीरात शिरकाव करण्याची संधी मिळते.

ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही, अशांना म्युकोरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता जास्त असते. कोविड -19 वरील उपचारा दरम्यान रोगप्रतिकारशक्ती दडपली जाण्याची शक्यता असल्याने अशा रुग्णांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

रोग व लक्षणे-:

मानवी शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला होतो,यानुसार म्युकोरमायकोसिसचे प्रकार पडतात.या संसर्गाची लक्षणेही त्या-त्या अवयवा नुसार भिन्न-भिन्न असतात.

● नाकाच्या पोकळीशी व मेंदूशी संबंधित म्युकोरमायकोसिस – सदर बुरशीचे सूक्ष्मकण नाकावाटे श्वासातून शरीरात गेल्यास याचा संसर्ग होतो.याचा परिणाम नाक,डोळ्याची खोबण, तोंडाची पोकळी यांवर होत असून हा संसर्ग मेंदूपर्यंतही पसरू शकतो. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी,नाक चोंदणे, नाकातून स्राव (हिरव्या रंगाचा) वाहणे, सायनसमध्ये वेदना, नाकातून रक्त येणे, चेहऱ्यावर सूज, चेहऱ्यावरील संवेदना नष्ट होणे व त्वचा डागाळणे यांचा समावेश होतो.

● फुफ्फुसांचा म्युकोरमायकोसिस – बुरशीचे सूक्ष्मकण श्वासावाटे शरीरात शिरून श्वसनसंस्थेत पोहोचतात तेव्हा त्यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. ताप, छातीत दुखणे, खोकला, खोकल्यातून रक्त पडणे ही याची लक्षणे होत.

  या बुरशीचा परिणाम जठर व आतडी,त्वचा आणि अन्य अवयवांवरही होऊ शकतो मात्र, सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे नाकाच्या पोकळीशी व मेंदूशी संबंधित म्युकोरमायकोसिस.
कोविड-19 रुग्णांनी करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय –

वैद्यकीय दृष्ट्या पुढील स्थितीतील रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, त्यांनी सतत स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि पुढील प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले पाहिजेत.

रक्तशर्करेच्या पातळीवर नेहमी लक्ष ठेवा आणि ती नियंत्रणात ठेवा- मधुमेहाच्या रुग्णांना सल्ला

मधुमेही (अनियंत्रित मधुमेह) + स्टेरॉइडचा वापर + कोविड पॉझिटिव्ह – या तिन्हींचे एकत्र अस्तित्व असल्यास रुग्णाला म्युकोरमायकोसिस संसर्गाचा प्रचंड धोका उत्पन्न होतो.म्हणून,मधुमेहींनी त्यांच्या रक्तशर्करेची पातळी सातत्याने लक्ष देऊन नियंत्रित ठेवली पाहिजे.

स्टेरॉईड्सचा गैरवापर झाल्याने व्यक्तीच्या रोग प्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होत असल्याने काळजीचे कारण उत्पन्न होते.

  कोविडचा सौम्य संसर्ग असणाऱ्या रुग्णांनी स्टेरॉईड्स घेणे टाळलेच पाहिजे. कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये स्टेरॉईड्सचा काहीही उपयोग होत नाही तर दुसरीकडे, स्टेरॉईड्स घेण्याने म्युकोरमायकोसिस सारखे दुसरे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.कोविड मधून बरे झाल्यावरही बुरशीजन्य संसर्गाचा मोठा धोका स्टेरॉईड्स वापरण्याने निर्माण होतो. म्हणून जर, एखाद्या कोविड बाधित व्यक्तीची रक्तातील प्राणवायूची पातळी सामान्य असेल आणि तो/ती क्लिनिकल दृष्टीने सौम्य लक्षणगटात मोडत असेल तर स्टेरॉईड्सचा वापर पूर्णपणे टाळलाच पाहिजे.

स्टेरॉईड्स घेणाऱ्यांनी त्यांची रक्तशर्करा पातळी नित्यनियमाने तपासत राहिली पाहिजे. बहुतेक वेळा, मधुमेह नसणाऱ्या व्यक्तीची रक्तशर्करा पातळी स्टेरॉईड्स घेतल्यावर मोठ्या प्रमाणात वाढून 300 ते 400 पर्यंत पोहोचू शकते. म्हणून, अशा व्यक्तीची शर्करा पातळी सातत्याने तपासणे व त्यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक ठरते.

“कोविड -19 रुग्णांनी उच्च मात्रेत स्टेरॉईड्स घेतल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही. सौम्य ते मध्यम मात्रा पुरेशा उपयुक्त ठरतात. हाती असलेल्या आकडेवारीनुसार, स्टेरॉईड्स जास्तीत जास्त 5 ते 10 दिवसांसाठीच दिले पाहिजे. शिवाय, स्टेरॉईड्स रक्तशर्करा वाढवून ठेवतात, आणि तिच्यावर नंतर नियंत्रण मिळविणे फार कठीण जाते.परिणामी, बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो”, असे प्रा.गुलेरिया यांनी सांगितले.

मास्क घालण्याला पर्याय नाही. हवेतील बुरशीचे सूक्ष्मकण व तंतू नाकावाटे सहज शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे, संसर्गास अटकाव करण्याच्या दृष्टीने मास्क घालण्याचे महत्त्व दुपटीने वाढते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या/ तेथे भेट देणाऱ्या लोकांनी याकडे खासकरून लक्ष दिलेच पाहिजे.

ही बुरशी आढळते कोठे?

म्युकोरमायसीट्स नामक तंतुमय बुरशीचे तंतू म्युकोरमायकोसिसला कारणीभूत ठरतात. ते हवेत, पाण्यात आणि अगदी अन्नातही आढळतात. हवेतील कवकधारी कानांच्या माध्यमातून ते शरीरात शिरकाव करू शकतात किंवा त्वचेला कापणे/भाजणे अशी दुखापत झाली असल्यास ते त्वचेवरही आढळतात.

या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास, संभाव्य अंधत्व किंवा मेंदूचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
अन्य प्रतिबंधात्मक उपाय-:
 1. (ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणाऱ्यांच्या बाबतीत) ह्युमिडीफायर म्हणजेच आर्द्रताजनक स्वच्छ ठेवणे व वेळोवेळी बदलणे
 2. ह्युमिडीफायरच्या बाटलीत जंतुविरहित सामान्य सलाईन वापरले पाहिजे व ते दररोज बदलले पाहिजे
 3. मास्क दररोज निर्जंतुक केले पाहिजेत.
अगदी किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नका –

नाक व डोळ्यांभोवती लालसरपणा आणि वेदना, ताप (सामान्यतः कमी), नाकातून रक्त येणे, नाक किंवा सायनसचा भाग चोंदणे,डोकेदुखी,खोकला, श्वासाची लांबी कमी होणे, उलटीतून रक्त पडणे, मानसिक स्थिती बदलणे,आंशिक दृष्टिहीनता.

डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य सेवा कर्मचारी यांची जबाबदारी –
  कोविड -19 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविताना म्युकोरमायकोसिसच्या प्रारंभिक लक्षणांविषयी माहिती द्या, उदा- चेहऱ्याशी संबंधित वेदना, चोंदणे, अतिरिक्त स्राव, दात सैल होणे, छातीत दुखणे आणि श्वास अपुरा पडणे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: