राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुंबईतील नगरसेवकांची संख्या वाढली; आता…


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या सन २००१च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे निश्चित केली आहे. २०११च्या जनगणनेनंतरही निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली होती.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.

दरम्यान, याआधी २७ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगरपालिका सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकेच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ होणार आहे.

राज्यातील सन २०११च्या जनगणनेची आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील शहर भागातील लोकसंख्या कमी झाली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा आधार घेऊन नवीन नऊ वॉर्ड तयार केले जाण्याची शक्यता आहे. या वाढीव वॉर्डमुळे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या नगरसेवक होण्याच्या इच्छेस धुमारे फुटणार आहेत.

भाजपची टीका

भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी राज्य सरकारने केवळ नऊ नगरसेवक का वाढविले, असा सवाल करत टीका केली आहे. नगरसेवकांची संख्या वाढविण्यामागे लोकसंख्या वा जनगणनेचा आधार आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. केवळ राजकीय सोयीसाठी आणि जवळ आलेली पालिका निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसकडून स्वागत

पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नगरसेवक आणि वॉर्ड संख्यावाढीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईतील अनेक वॉर्डमध्ये ४५ ते ५० हजारांहून अधिक मतदार आहेत. इतक्या मोठ्या मतदार संख्येपर्यंत पोहोचणे आणि तेथील नागरिकांच्या समस्या सोडवणे शक्य नसते. वॉर्ड संख्यावाढीमुळे संबंधित भागात नगरसेवक पोहोचू शकेल. त्यामुळे हा निर्णय मतदारांसाठी हितावह ठरेल, असे राजा यांनी स्पष्ट केले.

६४ ते २३६

सन २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या आधारावर तब्बल नऊ प्रभागांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सन १८७२मध्ये ६४ नगरसेवकांनी स्थापन झालेली मुंबई महापालिका दीडशे वर्षांनंतर २३६ नगरसेवक संख्येपर्यंत पोहोचणार आहे.

पश्चिम उपनगरात पाच, तर पूर्व उपनगरात चार

मुंबईत नव्याने तयार होणारे संभाव्य वॉर्ड हे प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरात असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात चार नवीन वॉर्ड तयार होतील, असे सांगण्यात येते. पूर्व उपनगरात पवईमधील विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड परिसरात एक, भांडुप-मुलुंडमध्ये एक, विक्रोळी-कांजुरमार्ग पूर्व येथे एक, नाहुर-भांडुप पश्चिमेस एक वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, कांदिवली, बोरिवली-दहिसरमध्ये प्रत्येकी एक वॉर्ड वाढू शकेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: