वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज – उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम
3 हजार 289 पोलीस अधिकारी व कर्मचारी,दोन एसआरपीएफ तुकडी,सहा वॉच टॉवर

पंढरपूर / नागेश आदापुरे, दि.11/11/2021:- कार्तिक शुद्ध एकादशी 15 नोव्हेंबर 2021 रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
कोरोना संर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षे साठी व वाहतुक नियत्रंणासाठी 3 हजार 289 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 15 पोलीस उपअधिक्षक, 41 पोलीस निरीक्षक,178 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक,1 हजार 955 पोलीस कर्मचारी व 1 हजार 100 होमगार्ड तसेच दोन एसआरपीएफ कंपनीच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.वारीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून,त्यांना आरोग्य सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार किट देण्यात येत आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर,महाव्दार घाट, महाव्दार,पत्राशेड या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग,मंदीर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहरा बाहेरुन वळविण्यात आली आहे .वाहतुक नियमनासाठी 12 ठिकाणी डायव्हर्शन पॉईंट व दोन ठिकाणी नाकाबंदी पाँईंट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहन धारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी 15 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून या वाहनतळांवर सुमारे पाच हजार पेक्षा अधिक वाहने पार्क करण्याची क्षमता असल्याचेही श्री.कदम यांनी सांगितले.

वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे – उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,पंढरपूर विभाग