मुंबई महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांनी लांबणार, कारण…
मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेचा कच्चा आराखडा पालिकेने मागील महिन्यात निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानंतर निवडणुकीसंदर्भातील प्रशासकीय घडामोडींना वेग येत असतानाच राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मुंबईतील वॉर्डच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचनेचे सर्वच गणित बदलले आहे. नऊ वॉर्ड वाढल्याने एक ते २२७ अशा सर्वच वॉर्डमधील लोकसंख्येच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी नव्याने पुनर्रचना, वॉर्डच्या सीमारेषा, भौगोलिक बदल या बाबी विचारात घ्याव्या लागणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने वॉर्डमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी याबाबतचा अध्यादेश निघण्यास अजून दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वॉर्ड संख्यावाढीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारचे विळ्याभोपळ्याचे नाते पाहता या अध्यादेशावर राज्यपाल सही करणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. राज्यपालांनी सही केली नाही तर सरकारला येणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये वाढीव वॉर्डच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागेल.
या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोग पालिकेला वॉर्ड फेररचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश देईल. नऊ वॉर्ड वाढवण्यासाठी २२७ वॉर्डची पुनर्रचना करावी लागणार आहे. यासाठी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुधारित कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यावर अभ्यास करून आयोग नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणार. यासाठी किमान पंधरा दिवसांचा वेळ द्यावा लागणार आहे.
आचारसंहिता मार्चमध्ये?
हरकती व सूचना नोंदवल्यानंतर वॉर्ड पुनर्रचनेचा अंतिम आराखडा तयार करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे पुनर्रचनेचा संपूर्ण आराखडा तयार होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आराखडा फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत तयार होईल. त्यानंतर वॉर्ड आरक्षण सोडतीसाठी मार्च उजाडू शकेल. मार्च १५नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लक्षात घेता २५ एप्रिलपर्यंत पालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता पालिका निवडणूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.