विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.डी.ए. पाटील यांचे निधन
विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.डी.ए. पाटील यांचे निधन Former Principal of Vivekananda College Dr.D.A.Patil passed away
कोल्हापूर – शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर बारावीच्या परीक्षेत ‘विवेकानंद पॅटर्न’निर्माण करत राज्यभर कोल्हापूरचे नाव उंचावणारे विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.दादासाहेब उर्फ डी.ए.पाटील यांचे वार्धक्याने निधन झाले. गुरुवारी सायंकाळी माणगाव येथील निवासस्थानी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
विद्यार्थीप्रिय प्राध्यापक,उत्तम प्रशासक,कर्तबगार प्राचार्य म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. प्राचार्य पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राविषयी कमालीची आस्था बाळगणारा, कृतीशील शिक्षक आणि विद्यार्थी हित जपणारा हाडाचा शिक्षक हरपला अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.शिक्षणाच्या माध्यमातून कर्तबगार पिढी घडविणाऱ्या प्राचार्य पाटील यांना शेतीची प्रचंड आवड होती.त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.बापूजी साळुंखे यांचा त्यांना सहवास लाभला होता.बापूजींच्या मुशीत घडलेल्या
प्राचार्य पाटील यांनी प्राचार्यपदावरुन काम करताना संस्थेच्या वैभवात भर घालणारी कामगिरी केली. हिंदी विषयात एमए झाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.तळमावले येथे प्राचार्यपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मिरज, इचलकरंजीसह, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपदी काम केले.
प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी रचनात्मक कार्य केले. ग्रंथालय, कॉलेज इमारती उभारल्या.प्राचार्यपद उत्तमरित्या सांभाळल्यानंतर संस्थेने त्यांना कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविली.
डॉ.बापूजी साळुंखे यांचे शिष्य असलेल्या प्राचार्य पाटील यांनी अवघ्या काही वर्षात विवेकानंद कॉलेजचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केला. बारावीची बोर्ड परीक्षा आणि विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत असे समीकरण बनले.विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देत त्यांनी कॉलेजची गुणवत्ता वाढवली.कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विवेकानंद कॉलेजचा बोलबाला झाला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालयाला त्यांचे नाव दिले आहे.
विवेकानंद कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी डॉ.डी. वाय.पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून काही वर्षे धुरा सांभाळली.विवेकानंद शिक्षण संस्थेत आजीव सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली. कर्तबगार प्राचार्य आणि उत्तम प्रशासक असा नावलौकिक कमाविलेल्या प्राचार्य पाटील यांचे गुरुवारी, ता.२७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.