महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्यपदी रविंद्र बेडकिहाळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या
सदस्यपदी रविंद्र बेडकिहाळ यांची निवड Maharashtra State Board of Literature and Culture Election of Ravindra Bedkihal as a member
 फलटण,दि.28 : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांची निवड झाली आहे.

मराठी भाषा विभागामार्फत सदर निवडीबाबतचा शासन निर्णय क्रमांक सासंमं-2020/प्र.क्र.6.भाषा 3 दि.27 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 वर्षांसाठी जाहीर झालेल्या 30 सदस्यीय समितीमध्ये डॉ.प्रज्ञा पवार, अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रविण बांदेकर, रविंद्र बेडकिहाळ, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे,फ.मु.शिंदे,डॉ.रामचंद्र देखणे,योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी,प्रकाश खांडगे,प्रा.एल.बी.पाटील, पुष्पराज गावंडे,विलास सिंदगीकर,डॉ.आनंद पाटील,प्रा.शामराव पाटील, दिनेश आवटी,धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, प्रा.रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ.संतोष खेडलेकर यांचा समावेश आहे.

स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मराठी भाषा साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली.त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे पहिले अध्यक्षपद भूषविले होते.

रविंद्र बेडकिहाळ हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून साहित्य व सांस्कृतिक चळवळीत कार्यरत आहेत. महाराष्ट्राचे आद्य समाजप्रबोधनकार ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे महाराष्ट्रातील पहिले स्मारक जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले जि. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आणि जांभेकरांच्या स्मरणकार्यात त्यांचा सातत्याने पुढाकार आहे. विद्यार्थी वर्गास व नव्या पिढीस ‘दर्पण’कारांचे कार्य माहिती व्हावे म्हणून ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर चरित्र व कार्य’ हा त्यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृति साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, साहित्य संमेलने खेडोपाडी व्हावीत यासाठी ग्रामीण भागात ‘शिवार’ साहित्य संमेलन सुरु करण्यात बेडकिहाळ यांनी पुढाकार घेतला आहे.मर्ढे ता.सातारा येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कै.बा.सी.मर्ढेकर यांचे स्मारकाची उभारणी व पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनात त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

सदर निवडीबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम,भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालया चे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा.मिलींद जोशी,मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी,सोपानराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी बेडके आदींसह सामाजिक, साहित्य,पत्रकारिता,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: