तुका म्हणे

              तुका म्हणे  -

सुखे वोळंबा दावी गोहा ।
माझे दुःख नेणा पहा ।।१।।

आवडीचा मारिला वैडा ।
होय होय कैसा म्हणे भिडा ।।२।।

अखंड मज पोटाची व्यथा ।
दुधभात साखर तूप पथ्या ।।३।।

दो प्रहरा मज लहरी येती ।
शुद्ध नाही पडे सुपत्ती ।।४।।

नीज न ये खाली घाली फुले ।
जवळी न साहती मुले ।।५।।

अंगी चंदन लाविते भाळी ।
सदा शूळ माझे कपाळी ।।६।।

निपट मज न चाले अन्न ।
पायली गहू सांजा तीन ।।७।।

गेले वारी तुम्ही आणिली साकर ।
सात दिवस गेली साडेदहा शेर ।।८।।

हाड गळोनि आले मांस ।
माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे ।।९।।

तुका म्हणे जिता गाढव केला ।
मेलियावरी नरका नेला ।।१०।।

अर्थ –

प्रापंचिक स्त्री पतीला म्हणते, तुम्ही माझ्या दुःखाकडे थोडेसुद्धा प्रेमाने पाहत नाही. माझे काय दुःख आहे हे तुम्ही थोडे सुद्धा समजून घेत नाही. ।।१।।

तिचा नवरा तिच्या प्रेमामुळे वेडा झालेला असल्याने तो तिला म्हणतो, होय होय तू म्हणते ते खरेच आहे. ।।२।।

बायको म्हणते, मला पोटदुखीचा त्रास आहे. त्यामुळे मला पथ्यासाठी दूधभात, तूप आणि साखर खावी लागते. ।।३।।

दोन प्रहर झाले (दुपारच्या वेळेस) मला झोपेच्या लहरी येऊ लागतात त्यामुळे मी झोपून घेते. ।।४।।

मात्र मला झोप येत नाही. मला अंथरून टोचते म्हणून मी अंथरूणाखाली फुले घालते. मात्र तितक्यात मुले दंगा करतात आणि मला झोपेचे सुख मिळत नाही. मला ही मुले आजूबाजूला असलेली सहन होत नाही. ।।५।।

अनेक प्रकारच्या काळजीमुळे माझे डोके गरम होत असते व दुखत असते. म्हणून मी अंगाला व कपाळाला चंदन लावते. मात्र माझ्या कपाळावर सतत शूळ उठलेला असतो. ।।६।।

मला साधे अन्न थोडेसुद्धा चालत नाही. मला तीन वेळेला पायलीभर गव्हाचा सांजा खाण्यासाठी लागतो. ।।७।।

गेल्या वारी (बाजारच्या दिवशी) तुम्ही साखर आणली मात्र सातच दिवसात ती साडेदहा शेर साखर संपली. ।।८।।

माझी हाडे जाऊन मांस आले आहे. मात्र तुम्हाला माझ्या दुःखाची थोडी सुद्धा जाणिव नाही. ।।९।।

तुकोबा म्हणतात, असा हा प्रापंचिक मनुष्य त्याच्या स्त्रीने जिवंतपणीच गाढव केलेला असतो आणि मेल्यावर तो सरळ नरकात जातो. (तात्पर्य – प्रपंचाच्या आहारी न जाता ईश्वरप्राप्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठेवावे.) ।।१०।।

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: