३१ मे जागतिक तंबाखू विरोध दिन

जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त प्रबोधन
May 31 is World No Tobacco Day
   पुणे,दि.३१-०५-२०२१ -इंडियन डेंटल असोशिएशन,पुणे (आयडीऐ) आणि बायोस्फिअर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.३० मे रोजी ३१ मे ह्या जागतिक तंबाखू विरोध दिनाच्या पूर्वसंध्येला जनजागृती करण्यासाठी वेबिनार आयोजित केला होता.यामधे तंबाखुचा निसर्ग इतिहास, पर्यावरणा वरील दुष्परिणाम,मुखकर्क रोग,फुप्फुसाचा कर्करोग तसेच व्यसनाधीनतेचे घातक परिणाम अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ डॉक्टरांनी समाजप्रबोधन केले.

या संदर्भात पर्यावरण शास्त्रज्ञ डाॅ.सचिन पुणेकर म्हणाले, तंबाखू मूळची अमेरिकेतील वनस्पती साधारणतः सतराव्या शतकात भारतामध्ये पोर्तुगीज लोकांकडून आणली गेली. ही वनस्पती भारतामधलं महत्त्वाचं नगदी पीक जरी असलं तरी आरोग्याला आणि सभोवतालच्या पर्यावरणाला, जैवविविधतेला या परकीय पिकाचा मोठा धोका आहे. हे धोके लक्षात घेता या पिकाला योग्य ते विकल्प उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.

 आयडीऐच्या सामाजिक व प्रतिबंधात्मक दंत चिकित्साविभाग प्रमुख व दंतरोगतज्ञ डाॅ.भक्ति दातार म्हणाल्या, गालाचे आतील पडदे,जीभेच्या खालील भाग,टाळू,ओठ तसेच हिरडीलाही कर्करोग होऊ शकतो.दुदैवाने तरुण मुली व तरुण स्त्रियांमधे तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. या साठी शाळा व महाविद्यालयांमधे जनजागृती वाढवणे गरजेचे आहे. थुंकण्याच्या प्रवृत्तीने संसर्गजन्य आजारांचाही धोका वाढतो.

  पुण्यातील मोदी क्लिनीकचे संचालक आणि फुप्फुसरोगतज्ञ डाॅ.महावीर मोदी यांनी तंबाख़ु सेवनावाटे शरीरात प्रवेश करणारी घातक रसायने, त्यांचे दुष्परिणाम तसेच फुप्फुसाचा कर्करोग,  काळा दमा यावर भर दिला.सिगरेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्येदेखील छातीचे विकार तर गर्भवती स्त्रीच्या गर्भावर देखील त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात,असे स्पष्ट केले .

अहमदनगरमधील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. नीरज करंदीकर यांनी मार्गदर्शनात सांगितले की, वय वर्ष २० ते ३० वयोगटामधे दिसणारी उदासीनता, डिप्रेशन व आत्मघातकी प्रवृत्तीत तंबाखू सेवनाकडे कल दिसून येतो आहे. कोणत्याही व्यसनातून मुक्त होण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन आवश्यक असते.

 आयडीऐ पुणे शाखेच्या अध्यक्षा डाॅ.मेघा पागे यांनी सर्वांना तंबाखू विरोधी दिन फक्त आजच नाही तर कायमस्वरूपी आचरणात असावा असे आवाहन केले. 

   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयडीऐ महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डाॅ.नितीन बर्वे यांनी भूषविले. कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व डॉक्टरांचे व लाभार्थीचे त्यांनी अभिनंदन करत तरुण वर्गाला आधुनिक तंबाखू सेवनाच्या प्रकारांबाबत सावधानतेचा इशारा दिला.आयडीऐ पुणे शाखेच्या सचिव डाॅ.अपर्णा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

 काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ तर काही व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणारे मान्यवर व्यक्ती संस्था आणि जनमाणसांनी या वेबिनारमधे हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: