शिवराज्याभिषेक दिनी शिवबीज अभियानाला जोमाने सुरुवात

शिवराज्याभिषेकदिन प्रित्यर्थ दुर्मिळ शिवसुमन वनस्पतीचे जलमंदिर पॅलेस,सातारा आणि मावळ परिसरातील गडकोटांवर रोपण Shivbeej Abhiyan started on the coronation day
  पुणे,दि.०७-०६-२०२१- बायोस्फिअर्स,माबि, संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे, देवराई संस्था,आम्ही भोरकर संस्था,सामाजिक वनीकरण, पुणे, वनस्पती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान, श्रीकृष्ण ट्रेडिंग, रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी, सत्यवीर मित्र मंडळ, आणि सह्याद्री इंटरन्याशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जून २०२१ रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हरित शिवबीज अभियानाची भोर मावळ आणि सातारात्यून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवबीज वापरून शिवरायांच्या मूर्तीला औक्षण करण्यात आले.

    शिवसुमन (फ्रेरिया इंडिका) या दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ वनस्पतीचे रोपण जलमंदिर पॅलेस, सातारा या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसुमन या वनस्पतीबाबत शास्त्रीय माहिती देणारे पत्रक देखील छत्रपती उदयनराजे महाराज यांना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांनी सुपूर्त केले. तसेच देशी स्थानिक बियांचा वापर करून साकारलेल्या शिवबीज चित्रातील बियांचे उपस्थित शिवप्रेमींना रोपणासाठी हस्तांतरण देखील करण्यात आले. भोर परिसरातील शेतकरी आणि निसर्गप्रेमी यांना स्थानिक-देशी वनस्पतींचे बीज या निमित्ताने देण्यात आले. जेणेकरून स्थानिक–देशी वृक्षांचे प्रमाण वाढावे या करिता आज पासून या हरित शिवबीज अभियानाची मुर्हतमेढ रोवण्यात आली. शिवराज्याभिषेकदिना निमित्ताने वेगळ्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन आज शिवप्रेमींनी केले आहे त्याचे विशेष समाधान सर्वांना आहे.

   जगाच्या पाठीवर केवळ सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये आढळून येणाऱ्या 'फ्रेरिया इंडिका' या वनस्पतीचे दोन वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक दिना निमित्त रायगडावरील शिवसदरेवर 'शिवसुमन' असे नामकरण करण्यात आले आहे. फ्रेरिया इंडिका या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग भगवा-लालसर असतो. त्यांचा आकार सुदर्शन चक्राप्रमाणे असतो.छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी आणि या वनस्पतीचा प्रथम शोधही शिवनेरीवरच लागला हे विशेष. या वनस्पतीचा प्रादेशिक आढळही सह्याद्री पर्वतरांगांतील गडकिल्ल्यांवरच आहे. 'शिवसुमन'ची पहिल्यांदा शास्त्रीय नोंद डालझेल या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावर केली होती.ही वनस्पती अतिसंकटग्रस्त असून जगभरात केवळ महाराष्ट्रातच आढळते.सह्याद्री पर्वत रांगामध्ये विशेषत:रंधा धबधबा,जुन्नर, शिवनेरी, सज्जनगड,पुरंदर,वज्रगड,मुळशी,शिवथरघळ, महाबळेश्वर, त्रंबकेश्वर, अंजनेरी अशा निवडक ठिकाणी तीव्र डोंगर-उतार व कड्यावर ७५० मी.ते १३५० मी.ऊंचीवर दगडी सुळक्यांवर व खडकांच्या बेचक्यांतच आढळून येते.पुणे जिल्हाचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह फुल म्हणूनही ही वनस्पती ज्ञात आहे.

 एकंदरीतच या अलौकिक फुलाचे पर्यावरणीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या वनस्पतीचा संवर्धनाचा कार्यक्रम देखील बायोस्फिअर्स आणि इतर सेवाभावी संस्थांनी हाती घेतला आहे. आज या सुदिनी रायरेश्वर, रोहिडेश्वर, तोरणा, राजगड या गडकिल्ले परिसरात या वनस्पतीचे रोपण करण्यात आले. भविष्यात या वनस्पतीचे रोपण स्वराज्यातील विविध गडकोटांवर व छत्रपती शिवरायांशी निगडीत असलेल्या स्थानांवर नागरिकांच्या सहभागातून केले जाईल.    

  या अनोख्या उपक्रमाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी कौतुक केले आणि पुढील सर्व हरित अभियानास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी वनस्पती शास्त्रज्ञ,माबि आणि बायोस्फिअर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, सचिन देशमुख,पराग शिळीमकर,सुनील जंगम, समीर घोडेकर,निलेश खरमाळे,हनुमंत खोपडे, गणेश मानकर, संजय गोळे, कालिदास धाडवे, अमित गाडे आणि शिवप्रेमी उपस्थित होते, या त्यांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी या हरित अभियानाला भोर मधून सुरवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: