तुका म्हणे – भक्तीप्रवाह
तुका म्हणे - भक्ती प्रवाह
मायबाप करिती चिंता ।
पोर नाईके सांगता ।।१।।
नको जाऊ देऊळासी ।
नेतो बागूल लोकांसी ।।२।।
वैष्णवा संगती ।
हाती पडली नेणो किती ।।३।।
कर्णद्वारे पुराणिक ।
भुलवी शब्दे लावी भीक ।।४।।
आम्हां कैचा मग ।
करिसी उघडीयाचा संग ।।५।।
तुका म्हणे जाणे नरका ।
त्यांचा उपदेश आइका ।।६।।
अर्थ –
प्रपंचात आसक्ती असणाऱ्या आईवडीलांच्या घरात परमार्थाची आवड असणारे मुल जन्माला आले तर ते आईवडील मूल त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही अशी चिंता करतात. ।।१।।
ते मुलाला भिती घालतात की, तू मंदिरात जाऊ नकोस. तेथे गेलास तर तुला बागूलबुवा पकडून नेईल. ।।२।।
वैष्णवांच्या संगतीत तू राहू नकोस. कारण त्यांच्या हाती सापडून कित्येक जण वाया गेले आहेत. (अर्थात वैष्णवांना संसारापेक्षा भक्ती प्रिय असल्याने ते संसाराकडे दुर्लक्ष करतात. हेच त्या आईवडीलांच्या दृष्टीने वाया जाणे.) ।।३।।
एखाद्या ठिकाणी पुराणकथा सुरू असेल तर तेथे बसू नकोस. कारण कथा सांगणारा पुराणिक कथेद्वारे गोड गोष्टी सांगून तुला भीक मागायला लावील. (अर्थात तुझ्या मनात संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न करील.) ।।४।।
जर तू विरक्त झालास तर मग आम्हाला दुरावशील. तू सर्वसंगपरित्याग करून विरक्तांच्या संगतीत रममाण होशील।।५।।
तुकोबा म्हणतात, अशा संसारात आसक्त असणाऱ्या आईवडीलांचा किंवा लोकांचा उपदेश त्यांनीच ऐका ज्यांना नरकात जाण्याची इच्छा असेल. ।।६।।