आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करण्यात येणार नेमणूक

पंढरपूर,दि.12: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची (वर्ग-1) नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास,पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे,प्रियंका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा न.पा. प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,गटविकास अधिकारी सुशिल संसारे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर कोणतेही अडचण येवू नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्विस रस्त्यांची, उड्डाण पुलांची कामे मुदतीत पुर्ण करावीत.पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुरमीकरण करण्यात यावे.पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे. महिला भाविकांसाठी वाळंवटात चेंजिंग रुम बाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करुन जागा निश्चिती करुन उत्तम दर्जाच्या चेंजींग रुमची उपलब्धता करावी.पालखी तळांसाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करुन पुर्ण झालेल्या कामाबाबत कळविण्यात येईल.तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापुर्वी पालखी मार्गावरील व तळांवरील सर्व कामे पुर्ण होतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सरदेशपांडे म्हणाले,पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस प्रशासना कडून नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांच्या वाहनांना वाहनपासची उपलब्धता करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस बंदोबस्त चोखपणे ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यास व वारकरी,भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

यावेळी वाखरी पालखी तळावर सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असल्याने वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या ठिकाणी कायमस्वरुपी सुविधा देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा. पालखी मार्गावर पर्यावरणपूरक झाडे लावण्यात यावीत,पंढरपूर शहरात पुर्णपणे प्लॅस्टिक बंदी करावी. श्री संत निळोबाराय, श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात येणाऱ्या दिंड्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, मोबाईल टॉयलेट व्यवस्था द्यावी, जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी प्राथमिक शाळा व हायस्कूल येथे राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून ऐन पावसाळ्यात वारकरी भाविकांना निवारा उपलब्ध होईल. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी जादा पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रमुख व प्रतिनिधी यांनी केली.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading