मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत आ.आवताडे यांनी फोडली वाचा
मतदारसंघातील विविध पायाभूत व मूलभूत विकास बाबींच्या मागण्यांसाठी आ समाधान आवताडे विधान सभेत आक्रमक
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या विविध पायाभूत आणि मूलभूत विकास बाबींच्या पूर्ततेसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे पावसाळी अधिवेशनादरम्यान मागण्या मांडत असताना आक्रमक झाले होते.
पंढरपूर शहरातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे चक्र निधीच्या माध्यमातून गतिमान करण्यासाठी आ समाधान आवताडे यांनी विविध मागण्या पोटतिडकीने विधिमंडळ सभागृहात शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
स्वच्छ शहर-समृद्ध शहर या शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या पंढरपूर वासियांच्या स्वच्छता सेवेमध्ये असणाऱ्या सफाई कामगारांच्या विविध मागण्या पाठीमागील अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकून राहिल्या आहेत. या मागण्या मांडत असताना आ आवताडे यांनी सांगितले की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल – रखुमाई वारीनिमित्त तसेच इतर दिवशीही लाखो वारकरी पंढरपूर शहरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. या सर्व भाविकांच्या व येथील स्थानिक नागरिकांच्या सफाई सेवेमध्ये मानवी विष्ठा उचलण्याचे व साफ करण्याचे काम करणाऱ्या मेहतर समाजातील समाज प्रमुखांनी व बांधवांनी मला वेळोवेळी भेटून त्यांचे योग्य ठिकाणी घरकुल सुविधेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याबाबत पाठपुरावा पत्रव्यवहार केला आहे.
त्या अनुषंगाने आमदार अवताडे यांनी पंतप्रधान आवास योजनेचा मुद्दा ही गाजवला.या समाज बांधवांच्या कामाची संवेदनशील मनाने एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी दखल घेऊन याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला असून स्वच्छतेच्या व शहर वातावरणाच्या प्रसन्नतेचे महत्वपूर्व काम करणारे या मंडळींसाठी आवश्यक ती निधीची तरतूद करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे.
त्याचबरोबर पंढरपूर शहराचे नैसर्गिक आणि वैभवशाली आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या जिजाऊ उद्यान व पद्मावती उद्यान या बागांच्या सुशोभीकरण व इतर भौतिक सोयी-सुविधा सक्षम आणि विस्तारित करण्यासाठी भरीव अशा निधीची तरतूद करून पंढरपूर शहरामध्ये असणाऱ्या या दोन प्रमुख उद्यानांचे रुपडे बदलण्यासाठी लवकरात-लवकर कार्यवाही सुरु करावी अशीही आ.आवताडे यांनी मागणी केली.
पंढरपूर शहरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जनतेच्या रस्ते, वीज पाणी व ड्रेनेज या सुविधा सुलभ आणि अद्यावत पद्धतीने उभारणीसाठी गेल्या काही वर्षांमध्ये पंढरपूर शहरासाठी ५०० कोटींचा निधी नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला होता परंतु अद्यापपर्यंत या सुविधा मार्फत शहरातील कोणतीच कामे या निधीतून झाले नसल्याचेही आमदार आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून या घोटाळ्यातील संबंधित नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे केली आहे.
मतदारसंघातील क्रीडापूरक खेळाडू व विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य गुणांना वाव देण्यासाठी व खेळाडूंना सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडांगण उपलब्ध होण्यासाठी मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही शहरांमध्ये स्वतंत्रपणे भव्य क्रीडांगणे उभारण्यात यावीत अशी ही मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक खेळाडू व विद्यार्थी विविध खेळांच्या माध्यमातून जिल्हा, राज्य व राष्ट्र पातळीवर आपले क्रीडा कसब दाखवून मतदारसंघाचे नाव उज्वल करत आहेत अशा खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन खेळाची कसरत करण्यासाठी ही क्रीडांगणे उभारणे गरजेचे असल्याचेही आमदार आवताडे यांनी सांगितले.
आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मेहतर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक बाबींसाठी शासनाकडे साद घातली नव्हती परंतु आमदार समाधान आवताडे यांनी सर्वसमावेशक विकास नितीचा अवलंब करुन या विषयावर शासनाचे लक्ष वेधल्याने आमच्या प्रलंबित प्रश्नांचा मार्ग लवकरच सुकर होईल. त्याबद्दल सर्व समाज बांधवांच्यावतीने मी आमदार आवताडे यांचे अभिनंदन करतो व यापुढील सार्वजनिक समाजकारण आणि राजकारण कार्यक्षेत्रामध्ये मेहतर समाज हा आ.आवताडे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभा राहिल- गुरू दोडिया अध्यक्ष,अखिल भारतीय सफाई मजदुर संघटना,पंढरपूर