कर्मवीरमधील शिक्षकांचे संस्कार व आई वडिलांचे श्रम यामुळे जीवनात यश – सोमनाथ माळी
कर्मवीरमधील शिक्षकांचे संस्कार व आई वडिलांचे श्रम यामुळे जीवनात यश मिळाले- सोमनाथ माळी
Success in life is due to the rites of the teachers in Karmaveer and the labor of the parents – Somnath Mali
पंढरपूर – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आई वडिलांचे श्रम यांनी मला यशापर्यंत पोहचविले आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाने मला वाचनाची प्रेरणा दिली.जागतिक स्तरावरील दिग्गज नेतृत्वांच्या आत्मचरित्रांचे वाचन केल्याने आपणही त्यांच्या सारखे अद्वितीय कार्य करावे. अशी प्रेरणा मला मिळाली. त्यातून मी खडतर परिश्रमांचा मार्ग पत्करला. जीवनाच्या विविध टप्प्यावर मला खूप चांगली माणसे भेटत गेली. त्यांच्याकडून आलेल्या अनुभवातून मला खूप कांही शिकता आले,असे प्रतिपादन सोमनाथ माळी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे हे होते.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सोमनाथ नंदू माळी यांची भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’वर ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याने प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला सत्कार करण्यात आला. यावेळी वडील नंदू माळी व बंधू सचिन माळी यांचाही सत्कार करण्यात आला.
इस्त्रोने संपूर्ण भारतातून केवळ दहा उमेदवारांची निवड केली असून यामध्ये महाराष्ट्रातून निवड झालेला एकमेव विद्यार्थी सोमनाथ माळी आहे. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की,पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावाचे सुपुत्र सोमनाथ माळी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत. त्यांचे आई, वडील व बंधू हे शेत शिवारात मोलमजुरी करतात.शेतमजुराच्या मुलाचा इस्त्रो मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ निवडी पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी व बुद्धी चातुर्याच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगात फार मोठ्या संधी आहेत. हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. सोमनाथ माळी यांच्या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सोमनाथ माळी हे २००९ ते २०१२ या कालावधीत महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकत होते. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील संधी मिळविण्याच्या उद्देशानेच त्यांनी मुंबई येथून बीटेक तर दिल्ली येथून एमटेकची पदवी संपादन केली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बजरंग शितोळे यांनी तर सूत्र संचालन डॉ.अमर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर विभागातील शिक्षक -शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी कोव्हीड १९ विषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती. उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष मुसळे यांनी मानले