ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रावर भर द्यावा -प्रशांत ननवरे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रावर भर द्यावा -प्रशांत ननवरे Students from rural areas should focus on statistics – Prashant Nanvare
संख्याशास्त्रात भारतात दुसरा क्रमांक मिळविलेल्या प्रशांत ननवरे यांचा स्वेरीत सत्कार

पंढरपूर- ग्रामीण भागात रहात असताना उच्चतंत्र शिक्षणात राज्यभर गाजत असलेल्या स्वेरी संस्थे मुळे शिक्षणाचे महत्त्व माहित झाले. त्यामुळे भविष्याच्या आखणीसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. केंद्र सरकारने घेतलेल्या संख्याशास्त्र च्या परीक्षेत मला भारतातून दुसरा तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याची संधी मिळाली. मला गणिताच्या शिक्षकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे हे शक्य झाले. संख्याशास्त्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रात अधिकाधिक रस घेऊन प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन संख्याशास्त्रात भारतात दुसरा क्रमांक मिळविलेल्या प्रशांत ननवरे यांनी केले.

       भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव ता. पंढरपूर येथील प्रशांत विजय ननवरे यांनी भारता मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. २०१४ नंतर संख्याशास्त्रात प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांने संख्याशास्त्रात यश मिळवल्याने प्रशांत ननवरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशांत ननवरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचे विद्यार्थी आहेत. या परीक्षेत देशातील सर्व विद्यापीठांच्या संख्या शास्त्र विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये आयोजिलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांत यांनाच उच्च यश संपादन करता आले. या स्पर्धेसाठी त्यांना पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आकांक्षा काशीकर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांत यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव तर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय,पोखरापूर , महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले आहे. पुढे पदवीचे शिक्षण घेवून पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून ‘स्टॅटीस्टिक्स’ या विषयातून पूर्ण केली. पुढे त्यांनी एम.एस.बी.आय. परीक्षेत भारतात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पंढरपूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.

यामुळे त्यांचा स्वेरी परिवाराच्यावतीने संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रशांत ननवरे म्हणाले की, ‘मला गणित विषयाची आवड, योग्य मार्गदर्शन आणि जिद्द यामुळे यशस्वी होता आले. उच्च शिक्षण घेताना झालेली दमछाक, त्यावर कठोर परिश्रमाने केलेली मात आणि संघर्ष यांची सविस्तर माहिती दिली.

 आपल्या हुशारीला शोभणारे पद मिळावे व त्या पदाचे महत्त्व देखील जपावे, असे सांगून अवघड परिस्थती असताना संयम ठेवून जिद्धीने वाटचाल करत राहिल्यास अपेक्षित यश मिळते,असे डॉ.रोंगे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र शिक्षक-पालक संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब दैठणकर, विजय ननवरे, सौ.विद्या ननवरे, मंगेश ननवरे, शहाजी ननवरे, स्वेरीच्या विश्वस्त सौ.प्रेमलता रोंगे, स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले. विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: