विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकासासाठी योगासनांचा अभ्यास करावा – योगशिक्षक मधुकर सुतार

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकासासाठी योगासनांचा अभ्यास करावा – योगशिक्षक मधुकर सुतार Students should practice yogasanas for academic development – Yoga teacher Madhukar Sutar

पंढरपूर / नागेश आदापूरे – “योग आसने ही शारीरिक आरोग्यासोबत मानसिकता दृढ ठेवण्यामध्ये उपयुक्त ठरतात. शरीर, मन आणि मेंदू यांचे संतुलन व्यवस्थित राहावे. यासाठी योगासनांचा नित्य अवलंब करावा. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकासासाठी योगासनांचा अभ्यास करावा.” असे प्रतिपादन योगशिक्षक मधुकर सुतार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्यावतीने ऑनलाईन योग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. 

मधुकर सुतार यांनी प्रात्यक्षिकांसह योग आसनांचे महत्व सांगितले.वज्रासन,शशिकासन,सूर्य नमस्कार,वक्रासन, उष्ट्रासन, सेतू बंदासन, शवासन, प्राणायाम,भस्रिका, कपालभाती व भामरी प्राणायाम या योग आसनांचे महत्व आणि प्रात्यक्षिक करून दाखविले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांची जीवनशैली बदलली आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार या बाबी गतीशील बनलेल्या आहेत. त्यामुळे आहार आणि विहार या बाबींकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने मनोविकार , हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, ताणताणाव आदी समस्या निर्माण झालेल्या आहेत. यातून माणसाला आरोग्यपूर्ण जीवन लाभण्यासाठी योग आसनांची गरज आहे.म्हणून विद्यार्थी,शिक्षण,समाजसेवक व सामान्यांना देखील योगासनांची आवश्यकता असते.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.घन:श्याम भगत यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक,विद्यार्थी हजर होते.उपस्थितांचे आभार प्रा.दादासाहेब हाके यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: