IPL 2022मध्ये चेन्नईचे नेतृत्व या खेळाडूकडे असू शकते, धोनीला कोणती जबाबदारी मिळू शकते पाहा…
चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनी यांनी भविष्यासाठी संघ व्यवस्थापनाला तयारी करायची असल्याचे स्पष्ट केले आहे. या हंगामापासून याची सुरुवात होणार असून धोनी संघाची कमान दुसऱ्या खेळाडूच्या हातात देऊ शकतो. कर्णधारपदाच्या शर्यतीत रविंद्र जडेजा पहिल्या स्थानी असून तो संघाचा कर्णधार बनू शकतो, अशी बातमी समोर आली आहे. धोनी संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे.
जडेजा चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू
चेन्नईने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी गेल्या मोसमात संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच विदेशी खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अलीची निवड करण्यात आली आहे. यावेळी जडेजाला नंबर वन खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. त्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो. मोईन अली तिसऱ्या क्रमांकाचा, तर ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
जडेजा हा घातक अष्टपैलू खेळाडू
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा जादुई कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जागी कर्णधारपदासाठी सर्वात मोठा दावेदार आहे, कारण चालू वर्षाच्या रिटेनशनमध्ये जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे देऊन कायम ठेवण्यात आले आहे. सीएसके फ्रँचायझी जडेजाला दीर्घकाळ आपल्या संघात कायम ठेवू इच्छिते. जडेजा त्याच्या शानदार गोलंदाजीसोबतच त्याच्या घातक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणात त्याचा सामना कुणीही करत नाही. आयपीएल २०२१ मध्ये आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जडेजाने हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये जडेजाने एकूण २०० सामन्यांमध्ये २३८६ धावा केल्या आहेत आणि १२७ विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजामध्ये कर्णधार बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.
गेल्या हंगामात म्हणजे आयपीएल २०२१ चे जेतेपद चेन्नईने पटकावले आहे. अशा परिस्थितीत या मोसमात पुन्हा एकदा आपले विजेतेपद वाचविण्याचे आव्हान चेन्नईच्या संघापुढे आहे. त्यामुळे चेन्नई संघाच्या भविष्यासाठी धोनी स्वतः या मोसमात ब्ल्यू प्रिंट तयार करू शकतो.