Punjab Election: सोनू सूदच्या बहिणीला तिकीट देताच काँग्रेसला मोठा धक्का; भाजपने साधली संधी!
हायलाइट्स:
- सोनू सूदच्या बहिणीला तिकीट दिल्याने नाराजीचा स्फोट.
- विद्यमान काँग्रेस आमदाराने भाजपमध्ये केला प्रवेश.
- पंजाबच्या निवडणूक आखाड्यात मोठ्या घडामोडी.
वाचा : चन्नी, सिद्धू मैदानात; सोनू सूदची बहीण आणि या गायकालाही काँग्रेसचं तिकीट
पंजाबमध्ये काँग्रेस मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे. काँग्रेसने आज ८६ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यावरून अंतर्गत नाराजी उफाळून येताना दिसत असून मोगा येथील विद्यमान आमदार डॉ. हरज्योत कमल यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसकडून डावलण्यात आल्याने नाराजीतून त्यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वाचा : करोनाने केली कोंडी!; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत…
मोगा मतदारसंघातून काँग्रेस नवा चेहरा देणार याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते. अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद हिला येथे उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. अलीकडेच तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खुद्द सिद्धू आणि चन्नी यांनी सोनू सूद याची मोगा येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर तिथेच मालविकाच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते व मालविकाला मोगातून तिकीट मिळणार हेसुद्धा जवळपास निश्चित झाले होते. आज प्रत्यक्षात काँग्रेसच्या पहिल्याच यादीत मालविकाला स्थान देण्यात आले. त्यानंतर काही तासांतच स्थानिक आमदार हरज्योत यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरज्योत यांचे पक्षात स्वागत केले. हरज्योत कमल यांच्या भाजप प्रवेशाने अधिक आनंद झाला आहे. यामुळे मोगा मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढणार आहे. त्यांच्या नावातच कमल आहे ही अधिक जमेची बाजू आहे, असे यावेळी शेखावत म्हणाले.
वाचा : भाजपची वेगळी चाल! योगी अयोध्येतून नाही, ‘या’ मतदारसंघातून लढणार