मैदानातच राडा; सामना संपताच दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी भिडले; एकमेकांना जमिनीवर पाडले अन्…
१४ जानेवारीच्या संध्याकाळी खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले. सामन्याच्या निकालामुळे आलेली निराशा या भांडणाचे कारण होते. घानाचा संघ जवळपास शेवटपर्यंत सामन्यात १-० गोलने पुढे होता, पण ८८ व्या मिनिटाला गॅबॉनने गोल करत सामना बरोबरीत रोखला. यामुळे घानाच्या बाद फेरीच्या निकालावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच खेळाडू संतापले होते.
घानाचा स्ट्रायकर बेंजामिन टेटेहने गॅबॉनच्या एका खेळाडूच्या तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे बेंजामिन टेटेहला त्याच्या चुकीची शिक्षा देताना रेफ्रींनी लाल रंगाचे कार्ड दाखवले. यामुळे २४ वर्षीय दोषी खेळाडू टेटेह मंगळवारी कोमोरोसविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. हा सामना अनिर्णित राहिल्याने घानाच्या अडचणी वाढल्या आहेत. फुटबॉलच्या मैदानात खेळाडूंमधील भांडणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण मारहाण करणे, एखाद्याला दुखापतग्रस्त करणे, हानी पोहोचवणे हे क्वचितच पाहायला मिळते. पण यावेळी तर दोन्ही संघांतील खेळाडू चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर मैदानात एवढा मोठा राडा झाला की, ते आरवणे कोणाच्याही हातात नव्हते, अखेर सुरक्षारक्षकांनाच पाचारण करण्यात आले आणि त्यांनी हा सर्व प्रकार थांबवला.