IND vs SAF : ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडू या एका गोष्टीनंतर भरकटले आणि त्यांनी सामनाच सोडला..’


INDvsSA : केपटाऊन : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला. या दरम्यान सर्वात जास्त चर्चा झाली ती एका वादग्रस्त डीआरएस (DRS) निकालाची. हाच निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला, असे म्हणता येईल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरनेही या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. तो म्हणाला की, यामुळे भारतीय संघ भरकटला आणि आमच्या संघाला धावा करण्याची संधी मिळाली.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २१ व्या षटकात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या एका चेंडूवर मैदानी पंचांनी डीन एल्गरला पायचित बाद म्हणून घोषित केले, पण एल्गरने या निर्णयाचा रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की, चेंडू स्टंपवरून जात होता आणि त्यामुळेच मैदानावरील पंचांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा या तंत्रज्ञानावर विश्वास बसत नव्हता. मैदानी पंच मॅरैस इरॅस्मस यांनाही चेंडू इतका उसळी घेईल, यावर विश्वास बसत नव्हता. यानंतर भारतीय खेळाडू स्टंप माईकवरून सतत काहीतरी टिप्पण्या करत होते.

या घटनेनंतर भारतीय संघ भरकटताना दिसला आणि यादरम्यान संघाने खूप धावाही दिल्या. आणि चौथ्या दिवशी विरोधी संघाने २१२ धावांचे लक्ष्य सहज गाठले. आणि दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

भारतीय संघ जरा जास्तच भावूक झाला
भारताविरुद्धच्या मालिका विजयानंतर एल्गर म्हणाला की, “मला ते आवडले, कारण त्याचा दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला. कदाचित हा एक असा संघ होता, जे थोडे दडपणाखाली होते आणि गोष्टी त्यांच्याप्रमाणे होत नव्हत्या. कसोटी क्रिकेटमध्ये झालेल्या या प्रकारामुळे आम्हाला धावा करण्याची आणि लक्ष्याच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. भारतीय संघ खेळाबद्दल विसरून गेला आणि जरा जास्तच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा आमच्या संघाला फायदा झाला आहे.

सेंच्युरियन येथे पहिली कसोटी ११३ धावांनी गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले. जोहान्सबर्गमध्ये सात गडी राखून विजय मिळविल्यानंतर केपटाऊन मधील तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजय साजरा करत मालिका आपल्या नावे केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: