प्रशिक्षकपद सोडल्यावर रवी शास्त्रींनी पार्टी बदलली? दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे कौतुक करताना म्हणाले…


INDvsSA : मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज कीगन पीटरसनचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने त्यांना महान फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली, असे शास्त्री म्हणाले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या २-१ अशा मालिका विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात या फलंदाजाने अर्धशतक झळकावले. त्यामुळेच त्याला सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कीगन पीटरसनने ७२ आणि ८२ धावा केल्या.

पीटरसनचे कौतुक करताना शास्त्री आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘एक महान खेळाडू तयार होत आहे. कीगन पीटरसनला पाहून मला माझ्या बालपणीच्या नायकाची म्हणजेच गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण झाली.’ उजव्या हाताचे फलंदाज विश्वनाथ हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी भारतासाठी ९१ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले. मनगटाचा उत्तम वापर करून ते स्क्वेअर कट खेळायचे. २८ वर्षीय पीटरसनही फलंदाजी करताना अशाच प्रकारे मनगटाचा वापर करतो. पीटरसनने तीन सामन्यांच्या मालिकेत सहा डावात २७६ धावा केल्या. त्यात तीन महत्त्वपूर्ण अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेत पीटरसन हा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा ठरला होता. संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा त्याने झुंजार खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच या मालिकेत तो सर्वोत्तम ठरल्याचे पाहायला मिळाले.

सामन्यानंतर पीटरसनने सांगितले की, ‘न्यूलँड्स येथील तिसरा सामन्यासह मालिकाही २-१ अशी जिंकल्यानंतर आनंद झाला आहे. मी सकारात्मकपणे खेळण्याचा प्रयत्न करत होतो. ही परिस्थिती पुरेशी आहे. मी फक्त माझ्या भक्कम बाजूंचा विचार केला. खूप लांबचा प्रवास राहिला आहे, आताच पूर्ण कथा सांगू शकत नाही. खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती. भारताचे गोलंदाजी आक्रमणही खूप आव्हानात्मक होते.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: