Crime news

सोलापूर शहर गुन्हे शाखेने एकूण सात गुन्हे उघडकीस आणत पावणेपाच लाखांचा ऐवज केला जप्त

सोलापूर शहर गुन्हे शाखेने घरफोडी,जबरी चोरी ,दुचाकी चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणून पावणेपाच लाखांचा ऐवज केला जप्त

सोलापूर, दि. ९- सोलापूर शहर गुन्हे शाखेने घरफोडी, जबरी चोरी व दुचाकी चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणून पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

आर्यन पॅराडाईज, डोणगाव रोड सलगर वस्ती सोलापूर येथे एक वृध्द महिला घरात एकटी असताना अज्ञात आरोपीने तिच्या घरात घुसून महिलेस मारहाण केली व तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने नेले होते. तसेच देशमुखनगर येथे घरफोडी झाली होती तर सर्वसुखी नगरात एक घरफोडी झाली होती. या तिन्ही चोरीचा तपास करताना पोलिसांनी ओंकार श्रीकांत जाधव वय २१, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं.४ सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४७.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण तीन लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार अनिल जाधव, राजू मुदगल, महेश शिंदे, कुमार शेळके, शिला काळे, ज्योती लंगोटे आदींनी केली.

दुसऱ्या घटनेत शिवाजी वसंत राऊत (वय ३२, रा. कल्याणनगर भाग ३) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून जोडभावी पेठ व मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यातील ५० हजारांच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस अंमलदार भोसले, शैलेश युगढ, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी केली.

त्याचप्रमाणे आरोपी आदित्य बसवराज दोडमनी ऊर्फ पोत्या यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळची ६० हजारांची मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ती जप्त केली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल तोगे, आवाजी सावळे, विठ्ठल यलमार,धीरज सातपुते यांनी केली आहे.

तसेच सिद्राम नागप्पा हावनूरकर रा.मंत्री चंडकनगर, भवानी पेठ सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील २० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार बापू साठे, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे यांनी केली आहे.

अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी घरफोडीचे दोन गुन्हे, जबरी चोरीचा एक गुन्हा आणि मोटारसायकल चोरीचे चार असे एकूण सात गुन्हे उघडकीस आणून एकूण पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप- आयुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर गुन्हे पथकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *