राजकीय न्यूज

महिला भगिनींच्या सक्षमीकरणास हे सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल- मुख्यमंत्री श्री.शिंदे

गडचिरोली,दि.09/01/2024 – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे, महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढच्या काळात देखील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर ते बोलत होते.

शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचत गटांच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असे अनेक निर्णय घेतले. आज लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, टिलर, ड्रोजर, हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. सुरजागडच्या माध्यमातून 10 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी 10 ते 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रामधून दरवर्षी 5 हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल हे सांगतानाच राज्यातील 1 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच ब्रँडिंग, मार्केटिंग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून राज्यातील जवळपास 2 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. 100 मोबाईल टॉवर, ग्यारापत्ती प्राथमिक आरोग्य पथक, मानव विकास मिशन अंतर्गत 8 एकल गोडावून, एकल सेंटर, आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद व नगर पंचायत प्रशासकीय इमारत, तालुका क्रीडांगण, रस्ते मजबुतीकरण, डांबरीकरण, पूल बांधकाम तसेच मार्कण्डा, चपराळा देवस्थान येथील कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *