राजकीय न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

घराणेशाही मोडून लोकशाही मजबूत करणारा निर्णय दिल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना की उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी याबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेल्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.तो ऐतिहासिक ठरणारा निकाल आज लागला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. हा नियमानुसार आणि कायदेशीर योग्य निर्णय आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत आहोत. बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन अबाधित राहिले आहे.या निर्णयाने उध्दव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे अशी प्रतिक्रीया आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांना दिली.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील आमदारांवर पात्रतेबाबत निकाल देतांना त्या सर्वांचे सदस्यत्व अधिकृत ठरविले आहे.शिवसेनेने 1999 मध्ये शिवसेनेचे संविधान बनविले त्यानंतर आता पुन्हा नविन संविधान बनविले. हा निकाल देतांना स्पिकर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे जुने 1999 चे संविधान आहे. तेच संविधान स्विकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. सुनिल प्रभु यांनी 16 आमदारांना निलंबीत करण्याचा जो उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने निर्णय दिला होता तो निर्णय शिवसेने च्या जुन्या संविधानानुसार त्यांनी बेकायदेशीर ठरविला आहे; रद्द केला आहे. शिवसेनेच्या जुन्या घटनेनुसार उध्दव ठाकरे यांना एकट्याला कोणत्याही आमदाराला पक्षातुन काढुन टाकण्याचा, निलंबीत करण्याचा पक्ष प्रमुख म्हणून अधिकार नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे उध्दव ठाकरेंनी नियुक्त केलेले व्हीप सुनिल प्रभु हे अनधिकृत व्हीप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले व्हीप भरत गोगवले हेच खरे शिवसेनेचे व्हीप असल्याचा निकाल स्पिकर राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत या निर्णयाचा महायुतीला प्रचंड फायदा होणार आहे. लोकसभेमध्ये 45 पेक्षा जास्त महाराष्ट्रात खासदार निवडुन आणण्याचा आमचा निर्धार आहे. तो निर्धार या निकालाने नक्कीच पूर्ण होईल.यापूर्वी निवडणुक आयोगाने सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. त्यानुसार त्यांना शिवसेनेच निवडणुक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असल्यामुळे बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला होता. त्यानुसार महाराष्ट्राचे स्पीकर राहुल नार्वेकर यांनी सुध्दा बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. हा लोकशाही मजबुत करणारा निकाल आहे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.या निकालाबद्दल ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *