पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंढरपूर देशपातळीवर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न – आ.समाधान आवताडे
पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ
रेल्वेने रस्ता दुरुस्त करुन प्रवासी आणि वाहनांसाठी उपलब्ध करून द्यावा – माजी आमदार प्रशांत परिचारक

चाळीस कोटी रुपये खर्चून स्टेशनचा होणार कायापालट
पंढरपूर, दि.06,(उमाका):- अमृत भारत स्टेशन अंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी दिल्लीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. अमृत भारत स्टेशन अंतर्गत जिल्ह्यातील पंढरपूर,सोलापूर , कुर्डुवाडी आणि दुधनी अशा चार रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 141 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरणातून स्टेशनचा कायापालट होऊन पंचतारांकित व्यवस्था सामान्य प्रवाशाला मिळतील.

या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे,आमदार समाधान अवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, मुख्याधिकारी अरविंद माळी, रेल्वेचे वरिष्ठ मंडळ यांत्रिकी अभियंता राहुल गर्ग, मुख्य वाणिज्य निरीक्षक एच व्ही चांगण, ए डी एन जनार्दन प्रसाद, मुख्य पर्यवेक्षक रमेश काळे, स्टेशन प्रबंधक चनगौडर, रेल्वे पोलीस निरीक्षक जाधव आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी संपन्न झाले.पंढरपूर रेल्वे स्थानकासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.या रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरणातून स्टेशनचा कायापालट होऊन पंचतारांकित व्यवस्था सामान्य प्रवाशाला मिळतील.यातून भविष्यात व्यापार वृद्धी देखील होताना पाहायला मिळेल.

यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले की,पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मागील 9 वर्षात 7 राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेले आहे.आता रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणानंतर ते देशपातळीवर जाईल. रेल्वे आणि रस्ते विकास झाल्यामुळे पंढरपूरच्या विकासाला चालना मिळाली असून याचा लाभ भाविकांसह शेतकऱ्यांनाही होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पंढरपूर हे देशपातळीवर एक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

नॅरोगेज ते इलेकट्रीक ब्रॉडगेज असा रेल्वेचा विकास झाल्याने पंढरपूरच्या विकासात मोठी भर पडली असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. रेल्वे स्थानकाच्या विकास होत असताना येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्यांची ये- जा सुखकर व्हावी, शहरातील वाहतुकीवर ताण येऊ नये यासाठी रेल्वेने आपल्या हद्दीतील स्टेशन ते भाई राऊळ पुतळा या दरम्यान सध्या अस्तित्वात असलेला रस्ता दुरुस्त करुन प्रवासी आणि स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही माजी आमदार परिचारक यांनी केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रमेश काळे यांनी केले.