national

पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 10 वर्षाचा कालावधी पूर्ण

पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे,त्या निमित्ताने….

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.16 :- पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर कडे शासनामार्फत सोपवण्यात आला आहे. सदरचा कायदा दि.26/02/1985 पासून अंमलात आलेला असून, तेंव्हापासून मंदिर समितीचे कामकाज सुरू झालेले आहे.तथापि सदर कायद्याला श्री.बडवे व उत्पात यांनी मे.सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेळोवेळी आव्हान दिल्यामुळे या कायद्याची संपूर्णपणे अंमलबजावणी माहे जानेवारी, 2014 पर्यंत झालेली नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने दि 15 जानेवारी 2014 रोजी अंतिम निर्णय दिल्यामुळे मंदिरातील बडवे, उत्पात व इतर यांचे अधिकार नष्ट झालेले आहेत आणि पंढरपूर मंदिरे अधिनियमानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आलेले आहे.त्यास दि.17/01/2024 रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने घेतलेला आढावा…………

व्यवस्थापन :-

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे श्री. विठ्ठल रूक्मिणीचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे.या‌ सर्व देवदेवतांची पुजा – अर्चा इ. दररोजचे नित्योपचार, नैमत्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणा-या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.

श्री.विठ्ठल रूक्मिणी या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे 1 कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात.शासनाने या मंदिरांचे संपूर्ण व्यवस्थापन करणेकामी सन 2017 मध्ये पंढरपूर मंदिरे अधिनियम,1973 च्या तरतुदीनुसार समिती नियुक्त केली आहे व या समितीला सल्ला देण्यासाठी सल्लागार परिषद देखील शासनाने गठीत केली आहे.

श्रींचे नित्योपचार व परंपरा :-

वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारा बरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख,धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार कर्मचा-यांकडून पार पाडण्यात येत आहेत.

श्रींच्या पुजेमध्ये भाविकांचा सहभाग :-

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची नित्यपुजा, पाद्यपुजा, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा, चंदनउटी पुजा इत्यादी पुजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये भाविकांचा खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पुजेची वाढती मागणी लक्षात घेऊन, नित्यपुजेत दोन भाविकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

श्रींच्या मुर्तीचे संवर्धन :-

श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणी मातेच्या मुर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने मुर्तीचा वज्रलेप शासन मान्यतेने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. तसेच परिवार देवतांच्या काही मुर्ती भंग पावल्याने त्याची देखील विधिवत पुजा करून बदलण्यात आलेल्या आहेत.

मंदिरांचा जिर्णोद्वार व संवर्धन :-

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे पुरातन, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्व असणारे मंदिर आहे. त्याच्या संवर्धनाचा व जिर्णोद्वाराचा आराखडा तयार करून शासन दरबारी पाठपूरावा करून निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरूवात केली आहे, काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरास प्राचीन मुळ रूप प्राप्त होईल. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनाकडून 73.85 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांच्या मंदिरांचा देखील समावेश आहे.

सोईसुविधा :-

दर्शनरांगेत भाविकांचे ऊन वारा पाऊस इत्यादीपासून संरक्षण करणे करणेकामी बॅरेकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, स्कायवॉक, उड्डाणपूल, पायांना खडे टोचू नये म्हणून मॅटींग, विश्रांती कक्ष, आपत्कालिन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर व चहा वाटप, ऑनलाईन /ऑफलाईन देणगी व्यवस्था,आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल,मोबाईल बंदी,चप्पल स्टँड,लाईव्ह दर्शन,रूग्णवाहिका, वॉटर एटीएम, प्रथमोपचार केंद्र, मोबाईल लॉकर्स, लाडूप्रसाद, फोटो विक्री, माहिती कक्ष इ.उपक्रम सुरू केले आहेत.

भाविकांची विमा पॉलीसी उतरविण्यात आली असून, यामधून आतापर्यंत मयत भाविकांच्या वारसास 40 लक्ष इतकी मदत देण्यात आली आहे. गेली 30 वर्ष श्रींची एकच प्रतिमा भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध होती. आता 31 प्रकारच्या विविध रंगाचे पोषाख असलेल्या प्रतिमा छपाई व फ्रेम करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर एलईडी बोर्ड, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा सुरू केल्या आहेत यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने 100 सीसी टीव्ही कॅमेरे, तात्काळ संपर्कासाठी 25 वायरलेस सेट, प्रवेशद्वाराजवळ बँग स्कॅनर मशिन व मेटल डिटेक्टर मशिन बसविण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रा कालावधीत सन 2018 पासून श्री.विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. मंदिरात विविध सण व उत्सवानिमित्त फुलांची आरास व विद्युत रोषणाई,बाजीराव पडसाळी येथील धोकादायक पिंपळाचे झाड काढून त्या ठिकाणी तरटीचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपन केले आहे.

 निवास व्यवस्था :- 

भाविकांना चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 300 खोल्यांची सुसज्ज अशी श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची इमारत उभी केली. यामध्ये तबक उद्यान, उद्वाहन, ऑनलाईन बुकींग, गरम पाण्याची सोय, उपहारगृह,हॉल, प्रशस्त पार्किंग,वातानुकुलित यंत्रणा व इतर अनुषंगीक अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. या इमारतीस ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मिळालेली जिल्ह्यातील ही एकमेव इमारत असावी. याव्यतिरिक्त वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास देखील उपलब्ध असून, या तिन्ही भक्तनिवासातून 1500 भाविकांची निवासाची सोय होत आहे.

    अन्नछत्र :- 

श्री संत तुकाराम भवन येथे भाविकांना दररोज दुपारी 12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत मोफत पोटभरून भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. त्याचा 2800 ते 3000 भाविक लाभ घेतात. यामध्ये रू.7000/- भरून इच्छीत दिवशी अन्नदान करता येते.

    लाडूप्रसाद :-

श्रींचा प्रसाद म्हणून देण्यात येत असलेला बुंदी लाडूप्रसाद आऊटसोर्सिंग पध्दतीने खरेदी करण्यात येत होता.सदर लाडूप्रसाद चांगल्या गुणवत्तेचा नसल्याने संबंधित पुरवठाधारकाचा ठेका रद्द करून मंदिर समिती मार्फत बुंदी लाडूप्रसादाची निर्मिती करून भाविकांना चांगल्या दर्जाचा बुंदी लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे, वारकरी भाविकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंदिर समितीने केला आहे.

जागतिक महामारी अर्थात कोरोना :-

जागतीक महामारी अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री सहायता निधीला रू.1.00/- कोटीची मदत, ऑक्सीजन मशिन,रूग्णवाहिका,पीपीई किट, वन गाई व भटक्या जनावरांना चारा, फुड पॅकेट व निवास व्यवस्था केली. या महामारीत दरवर्षी 10 ते 12 लाख लोकांची आषाढी व कार्तिकी वारी साजरी करता आली नाही. परंतू, या महामारीत सर्व प्रथा व परंपरांचे पालन करून व संख्यात्मकदृष्ट्या अत्यल्प मात्र भक्तीरसाने भरलेली वारी आयोजित केली.

   जमिनी :-

सन 2015-2023 या कालावधीत हे. 469.66 आर इतकी जमीन ताब्यात घेतली आहे. सदर जमिनीतून उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.आतापर्यंत रू.83,47,869/- इतके उत्पन्न मिळाले आहे.

  सोने-चांदी दागिने :-

श्रीस परिधान करण्यात येणारे मौल्यवान दागदागिन्यांचे मुल्य अमुल्य असून सदरचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहे, यासर्व अलंकाराचे जतन करण्यात आले आहे. भाविकांकडून आतापर्यंत सुमारे 40 किलो सोने व 1150 किलो चांदीच्या वस्तू भेट प्राप्त झालेल्या आहेत.

गोशाळा :-

मंदिर समितीची पंढरपूर नगरपरिषद हद्दीत यमाई तलाव येथे गोशाळा असून या गोशाळेत लहान-मोठी सर्वसाधारणपणे 250 गाई-वासरे आहेत. या गाईंपासून मिळणा-या दुधाचा वापर श्रींच्या नित्योपचारासाठी व अन्नछत्रामध्ये करण्यात येतो. या गाईंच्या संगोपणासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व पुरेसा प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

 हद्दीबाहेरील कामे / मदत :-

पंढरपूर नगरपरिषद हद्दीत मंदिर प्रदक्षिणा मार्ग, पालखी प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट इत्यादी ठिकाणची स्वच्छता, पंढरपूर ते मंगळवेढा या पालखी महामार्गावरील वृक्षांची देखभाल तसेच पंढरपूर शहरातील 150 मठांमध्ये 1250 शौचालयांची निर्मिती, पुरग्रस्तांना फुड पॅकेट -आर्थिक मदत, शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत, शासनास दुष्काळ निधी इत्यादी खर्च मंदिर समितीच्या निधीतून करण्यात आला आहे.

  कार्यालयीन कामकाज :-

समितीच्या 270 कर्मचा-यांची सेवा संरक्षित करून 6 वा वेतन आयोग लागू केला आहे व त्यांना गणवेश, ओळखपत्र, अनुकंपा, सेवानिवृत्तीनंतर मदत, सेवा शर्ती लागू करणे, प्रशिक्षण, कर्तव्य सुची निश्चिती, विमा पॉलीसी अशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, लेखा अधिकारी ही पदे शासन नियुक्तीवर भरण्यात येतात. तसेच कामकाजात सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

प्रस्तावित प्रकल्प :-

श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणे तसेच मंदिरात भजन, किर्तन व सप्ताह अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना चांगले व्यासपीठ मिळवून देणे व या कार्यक्रमांचा आनंद भाविकांना घरबसल्या उपलब्ध करून देण्याबाबत कम्युनिटी रेडीओ केंद्राची स्थापना, वारकरी सांप्रदयाच्या संत वाड्मयाचे व भागवत धर्माचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी व त्यास प्रसिध्दी देण्यासाठी व त्यांचा प्रचार करण्यासाठी संत तुकाराम महाराज संतपीठ या नावाची परिसंस्था स्थापन करणे, अत्याधुनिक पध्दतीच्या इस्पितळाची निर्मिती शासनाच्या मदतीने राबविण्याचा मानस आहे.

एकंदरीत या सर्व कार्यास वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून, आता मंदिर समितीचे वार्षिक अंदाजपत्रक 15 ते 20 कोटी वरून 55 ते 60 कोटी झाले आहे. सर्व महाराज मंडळी, मंदिर समितीचे सर्व सन्माननीय सदस्य – अधिकारी, वारकरी, भाविक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभत असून, श्रींच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खुप चांगले सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *