Uncategorized

धार्मिक पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या घरी प्रभू श्रीराम कृपा पूजा,दर्शन व आरतीचे आयोजन

पत्रकारांशी साधला संवाद

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ जानेवारी २०२३ : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी प्रभू श्रीराम कृपा पूजा,दर्शन व आरती चे आयोजन करण्यात आले.

यादरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या,येत्या २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि अयोध्या न्यास यांच्यावतीने अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा एक केवळ मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम नसून शांततेच्या मार्गाने ज्यांना आराधना करायची आहे त्यांच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. तसेच ज्यांची यावर श्रद्धा आहे त्यांच्यावर बळजबरी करणाऱ्या प्रवृत्तींवर न्यायालयीन मार्गाने तोडगा काढून यश प्राप्त झाले आहे. हे भारतीय लोकशाहीचे यश असून यामुळे इतिहासाला कलाटणी देणारी घटना असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर आज घरामध्ये प्रभू श्रीराम कृपा पूजेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या इतिहासामध्ये २२ जानेवारी २०२४ हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

धार्मिक पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला गती

राज्यात देशात मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र ठिकाणी अनेक श्रद्धाळू येत असून त्यातून उद्योगधंद्यांना चालना देणारी केंद्रे ही ठिकाणे बनत चालले आहेत ही खूप महत्त्वाची बाब आहे. धार्मिक पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. त्यामुळे तिर्थक्षेत्रांच्या विकासाचे सर्वांनीच स्वागत केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

२३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यभर विविध क्षेत्राशी संबंधित सकारात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

देशातील सर्व पीठासिन अधिकारी यांची २७ व २८ जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा

२७ आणि २८ जानेवारी रोजी विधानभवनात देशातील सर्व विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांची संयुक्तपणे परिषद मुंबई येथे होणार असून त्याबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही कार्यशाळा ही २० वर्षांनंतर मुंबईत होत आहे.देशातील सर्व विधीमंडळांमध्ये समन्वय असावा हा या परिषदेचा हेतू आहे.

CSW ६८ मध्ये स्त्री आधार केंद्राचा सहभाग

संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने जगभरातील महिलांच्या परिस्थितीबाबत ११ ते २२ मार्च रोजी युनायटेड नेशन्स कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन ६८ (CSW 68) सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून दीड हजार सामाजिक संस्थांना मुद्दे मांडण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये स्त्री आधार केंद्राला देखील ही संधी मिळाली आहे.त्यानुसार १६ मार्च रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या काळामध्ये म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात लैंगिक समानतेला सायबर क्राईममुळे निर्माण झालेली आव्हाने या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये नेदरलँड, इंग्लंड, जपान, नेपाळ यांसह पाच ते सहा देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

२०२४ ला पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्याप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेला वेळ देत आहेत,संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात आहेत, महिलांना न्याय देण्याबाबत महिलांना सन्मान, महिलांना अधिकार यासारख्या विविध लोक उपयोगी योजना ते राबवत आहेत त्यामुळे आगामी २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होतील असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *