State news

बुलढाणा पोलिसांकडून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल-उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले होते निवेदन

बुलढाणा पोलिसांकडून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पाठविला केसमधील कार्यवाहीचा प्रगती अहवाल

अडीच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराबाबतच्या घटनेची तात्काळ दखल घेत सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षेबाबत बुलढाणा पोलीस अधीक्षकांना उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले होते निवेदन

मुंबई, दि.१९ जानेवारी २०२३: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात १७ वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना २४ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती.सदर घटनेची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ गंभीर दखल घेत आरोपीवर कारवाई करण्याचे लेखी निर्देश दि.२४ नोव्हेंबर,२०२३ रोजी दिले होते. त्याची बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत आरोपीवर एक महिन्याच्या आतमध्ये दोषारोपपत्र दाखल करत कडक कारवाई केली आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांना सादर केला आहे.

यामध्ये गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपीला तात्काळ अटक करून बुलढाणा मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी हा अल्पवयीन असल्याने बाल सुधारगृहात दाखल करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपीला सध्या बाल सुधारगृहात ठेवले आहे. सदर आरोपीस जामीन मिळू नये याबाबत पोलीस काळजी घेत आहेत तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तिला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीडीतेला न्यायालयात सक्षम सरकारी वकील मिळावा याबाबत न्यायालयाला विनंती केली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पोलिसांनी तत्परतेने घटनेची सखोल चौकशी करून आरोपीस तात्काळ अटक केली. तसेच याबाबत आवश्यक अहवाल केला. या कारवाईबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर घटनेवर यापुढेही लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *