Crime news

अजमिर सौंदाणे निवासी आदिवासी शाळेतील प्रकाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

अजमिर सौंदाणे येथील निवासी आदिवासी शाळेतील प्रकाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई दि.१९ जानेवारी २०२४ : नाशिक जिल्ह्यातील अजमीर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतीगृह अधिक्षकांच्या गैरप्रकाराची घटना समोर आली आहे.याबाबत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याची गंभीरपणे दखल घेतली असून नाशिक आदिवासी विकास विभाग आयुक्त श्रीमती नयना गुंडें व पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना लेखी निवेदनाद्वारे संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यामध्ये उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी म्हटले आहे की,सदर आश्रम शाळेतील सहा विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मुलींच्या तक्रारीनंतर विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. या विशाखा समितीने सविस्तर चौकशी केली होती. याबाबत तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबधीत शिक्षक व अधिक्षक यांना सेवेतून बडतर्फ करुन पोक्सो व इतर कायद्यातील तरतुदी अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यासोबतच आश्रम शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा. सदर मुख्याध्यापकास निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी.यामधील पिडीत मुलींचे समुपदेशन करावे. त्यांचे मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तात्काळ पाठवून द्यावेत व त्यांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत दिली जावी.तसेच यामधील मुलींचे शिक्षण सुरू राहील याबाबत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी या लेखी निवेदनात दिले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कुरळप येथील आश्रमशाळ्येमध्ये २०१८ मध्ये आश्रमशाळा प्रमुखाने अनेक मुलींवर अत्याचार केला होता.यामध्ये डॉ गोऱ्हे यांनी स्वतः भेट दिली होती व आरोपीला तात्काळ अटक करायला लावून कडक कारवाईच्या सूचना सांगलीच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक यांना दिल्या होत्या. नुकतीच जानेवारी २०२४ मध्ये या आरोपींना ४ वेळा जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने जाहीर केली आहे.त्यामुळे असे अत्याचार झालेल्या मुली धाडसाने पुढे येत आहेत.

या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माझ्या कार्यालयात सादर करण्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आदिवासी आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *