भक्ती प्रवाह – तुका म्हणे
तुका म्हणे -
आम्ही बळकट जालो फिरवूनि ।
तुमच्या वचना तुम्हा गोवू ।।१।।
जाले तेव्हा जाले मागील ते मागे ।
आता वर्म लागे ठावे जाले ।।२।।
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध ।
शुद्ध त्यासी शुद्ध बुद्ध व्हावे ।।३।।
तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय ।
आपणचि होय तैसाचि तू ।।४।।
अर्थ –
देवा ! तुम्ही आमची खूप कसोटी पाहिली. पण त्याचा फायदा असा झाला की आम्ही आता बळकट झालो आहोत. तुमच्याच वचनांमध्ये तुम्हालाच कसे गुंतवून ठेवायचे हे आम्हाला आता समजले आहे. ।।१।।
यापुर्वी जे झाले ते झाले. पण आता तुमचे वर्म आम्हाला सापडले आहे. (तुम्ही कोणत्या मार्गाने आम्हाला प्राप्त व्हाल हे आम्हाला समजले आहे.) ।।२।।
ते वर्म हेच की, सर्व कर्मांचा व त्यांच्या कर्मफळांचा संबंध तोडण्यासाठी जे शुद्धतत्त्व आहे त्याच्याप्रमाणेच आपण शुद्ध व ज्ञानी बनावे. ।।३।।
तुकोबा म्हणतात, आम्हाला आत्मत्वाची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्याप्रमाणे आत्मस्वरूप बनायला हवे. ।।४।।