समृध्द जीवन कसे जगावे आपल्यासाठी आणि इतरांसाठी

समृध्द जीवन कसे जगावे आपल्यासाठी आणि इतरांसाठी How to live a prosperous life

माझा जन्म २८ डिसेंबर १९५६ चा शालेय दाखल तारीख नोंदीप्रमाणे ०१ जून १९५६. जन्मस्थळ मु. पो. अकिवाट, ता. शिरोळ. लहानपणाचा काळ अत्यंत खडतर परिस्थितीशी तोंड देत प्राथमिक शिक्षण कुमार मराठी शाळा, अकिवाट येथे इयत्ता १ ली ते ७ इयत्ता वी पर्यंत तात्यासो सुतार (बडिगेर) गुरुजी एकच वर्गशिक्षक सात वर्षे लाभले होते. माध्यमिक शिक्षण श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे इयत्ता ८ वी ते इयत्ता ११ वी पूर्ण केला (१९६९ ते १९७३)

      याच दरम्यान इयत्ता ५ वीत असताना ११ डिसेंबर १९६७ रोजीचा भूकंप व १९७२-१९७३ इयत्ता ११ मध्ये शिकत असताना महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ तसेच आताचा ऑगस्ट २०१९ चा आसमानी संकट ठरलेला प्रलयकारी महापूर या नैसर्गिक आपत्ती आणि २०२० या महामारी कोविड-१९ अनुभवल्या.   

      कॉलेज शिक्षण (१९७७) मध्ये बी. ए. पर्यंत श्री शहाजी छत्र महाविद्यालय, कोल्हापूर येथे 'कमवा व शिका' योजनेतून पूर्ण केले. कै. श्रीपतराव बोंद्रे (माजी कृषी राज्यमंत्री - महाराष्ट्र राज्य) यांच्या आशीर्वादाने आमच्याच श्री. शहाजी छत्रपती कॉलेज, कोल्हापूरमध्ये २ वर्ष कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी केली. नंतर आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय गारगोटी, जिल्हा - कोल्हापूर येथे १९८१-८२ मध्ये बी. एड. पदवी घेतली. कोकणात जाण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यामुळे ५ जुलै १९८२ पासून ते ३१ मे २०१४ अखेर एकाच शाळेत (सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगाव (बुद्रुक), तालुका - कुडाळ, जिल्हा -  सिंधुदुर्ग) येथे ३२ वर्ष 'सहाय्यक शिक्षक' म्हणून सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालो.

      कोकणातील निसर्ग सौंदर्य, वनराई, झरे, डोंगर, पशू-पक्षी, स्वच्छ व शुद्ध हवा-पाणी, फुले, फळे, भरपूर पाऊस व कडाक्याचा उन्हाळा, समुद्र किनारपट्टी, नारळी पोफळीच्या बागा तसेच मायाळू पालक, होतकरू गरीब विद्यार्थी, अत्यंत सेवाभावी असलेला ख्रिश्चन समाज यामुळे लग्नापूर्वीची ५ वर्षे सन १९८७ पर्यंत फारच मजेत, खेळण्यात, फिरण्यात आणि पायी प्रवासात आनंदात गेली. १ जुलै १९८७ रोजी विवाह बंधनात अडकलो.

      कोकण कर्मभूमी झाल्याने माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेच्या चळवळीत कै. शिक्षक आमदार वसंतराव बापट (ठाणे) शिक्षक आमदार सुरेश भालेराव (कल्याण), शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते (उल्हासनगर), प्राध्यापक आमदार अशोक मोडक (डोंबिवली), आमदार दिवाकर जोशी (नागपूर), आमदार संजीवनीताई रायकर (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (रजि.) संघटनेचा ४ वर्ष जिल्हा सेक्रेटरी व १६ वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सिंधुदुर्गातील सर्व माध्यमिक शाळा, संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई यांचा पूर्ण परिचय अनुभवण्यास मिळाला. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या जिल्हा पत संस्थेवर दोन वेळा संचालक म्हणून निवडून येऊन १० वर्षाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाण ओरोस (सिंधुदुर्ग नगरी) येथे जिल्हा पतसंस्थेची रुपये ८९ लाखाची इमारत अत्यंत देखणी व सुसज्ज अशी बांधली. संघटनेचे कार्यालयसुद्धा शिक्षकांच्या मदतीतून दुमजली इमारत बांधून पूर्ण केली.

      दरम्यान पंचायत समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, विधानसभा निवडणुका दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संपर्कात आलो. यामुळे शाळेसाठी डोंगरी विकास निधी, आमदार, खासदार फंड असा एकूण ७ लाख रुपये शाळे साठी मदत मिळवून घेतली. संघटनेचे काम इतर सामाजिक कामे, इतर शैक्षणिक कामे करीत असताना शाळेच्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. त्यामुळे आपोआपच विद्यार्थी, पालक, समाज इतर शाळांचे संबंध स्नेहपूर्ण झाले.

इयत्ता १० वी बोर्डाचा निकालसुद्धा सुरूवातीला ६० % पर्यंत नंतर शेवटची १० वर्ष माझ्या इंग्रजी विषयाचा निकाल १००% लागत असल्याने हित शत्रूंची तोंडे आपोआप बंद झाली.

      माझी मोठी कन्या मेघा मार्च २०१० मध्ये इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९९.६४% गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी व राज्यात तिसरी आली होती.यश म्हणजे काय? त्यावेळी समजलं. पालकमंत्री नारायण राणे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला होता. एक पालक व शिक्षक म्हणून मला फारच आनंद झाला होता. सध्या ती बी.एस्सी. (नर्सिंग) होऊन डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग कॉलेज, जयसिंगपूर येथे प्राध्यापिका म्हणून नोकरीत आहे.

   दुसरी कन्या एम. कॉम. होऊन 'फोर्ड कंपनी' सांगलीला नोकरी करते. तिचे पती 'माई ह्युंदाई' मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतात. तिसरी कन्या १२ वी कॉमर्सला कन्या महाविद्यालय, सांगली येथे इंग्रजी माध्यमातून शिकत आहे.

   प्रवासाचा छंद,व्हॉलीबॉल म्हणजे माझा जीव की प्राण, व्यायाम, पहाटे लवकर उठण्याची सवय, भरपूर कष्ट करण्याची आवड यामुळे कोकणात प्रकृती चांगली राहिली. मुळातच निर्व्यसनी, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, भरपूर फळे, भाजी, भटकंतीमुळे प्रकृतीने साथ चांगली दिली आणि सध्याही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. शुगर,बी.पी.,पित्त, अँसिडिटी, सांधेदुखी, गुडघेदुखी कसले काय ते माहिती नाही. परमेश्वरी कृपेने दवाखान्याची पायरी चढण्याची फारशी वेळ आली नाही. परंतु माझी पत्नी सौ.महादेवी मा‍झ्याच गाडीवरून पडली. तिच्या डोक्याला मार लागला, परंतु सुदैवाने ‘श्री सिद्धेश्वर’ कृपेने तिला काहीच झाले नाही. ती बरी झाली, तेवढाच दवाखान्याचा अनुभव...!

      मे २०१२ पासून मी जयसिंगपूरला राहण्या साठी आलो. नवीन फ्लॅट चांगला असून सुखा-समाधानात आहे.ज्येष्ठ नागरिक सेवा संघात भूपाल भाऊ गुरव, डी.आर.खामकर यांनी काम करण्याची संधी दिली .सध्या 'सचिव' म्हणून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची जबाबदारी आहे. कोकणात असताना (आर.एस.एस.) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा 'प्रथम वर्ष' पुण्यात पूर्ण केल्याने थोडीशी बहुश्रृतता व सामाजिक बांधीलकीची जाणीव झाली आहे. तरूणपणात 'संघर्ष हेच जीवन' चांगलाच अनुभवण्यास मिळाला. कष्ट करण्याची जिद्द, वचन, चिंतन, मनन, डायरी-लेखन यामुळे अत्यंत समृद्ध जीवन जगता आले. पत्रव्यवहार, रेकॉर्ड, लेखन, सामाजिक भान व घरात मुलांसाठी सुद्धा वेळ राखून ठेवण्याची कला टाईम मॅनेजमेंट फार सांभाळली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमात अगदी वेळेत हजर, शाळेतसुद्धा प्रार्थनेपूर्वी अर्धा तास नियमितपणे उपस्थिती, टाचण वही लिहिणे, सर्वच बारीक-सारीक कामाकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची सवय यामुळे 'शिस्त' अंगी बाणवली गेली.

   ऑक्टोबर २०१९ मध्ये आळते,हातकणंगले, जिल्हा - कोल्हापूर येथील धम्मालय (विपश्यना केंद्र) चालविले. १० दिवसांच्या विपश्यनामुळे सारे जीवनच बदलून गेले. ‘ध्यानधारणा’ चे महत्त्व ‘मनशक्ती’ याची चांगलीच अनुभूती मिळाली. विपश्यनामुळे प्रभावित होऊन अनेकांना यासाठी प्रेरित करून १० दिवसांचा कोर्स त्यांनीही पूर्ण केला.

     आई-वडीलांचे आशीर्वाद,चांगले शिक्षक, मित्र,मार्गदर्शक,आबाल-वृद्ध, गुरुजन, गृहकृत्यदक्ष पत्नी लाभल्याने मला त्यांच्या ऋणात राहावेसे वाटते. ईश्वर सर्वांना सुखात, आनंदात ठेवू दे हीच प्रार्थना...!

      ॥शुभास्ते पंथान॥
  • आवटे मधुवीर साताप्पा (जयसिंगपूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: