राजकीय न्यूज

गरीब पैलवानांच्या अडचणी दूर करण्यासाठी राजकारणात पदार्पण -पै.सादिक पठाण

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सादिक पठाण यांचा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

गरीब पैलवानांच्या अडचणी दूर करण्यासाठी राजकारणात पदार्पण -पै.सादिक पठाण

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सादिक पठाण रा.पेहे ता. पंढरपूर यांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा,पंढरपूर तालुका व पंढरपूर शहर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यासंबंधी वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आणि पैलवान सादिक पठाण यांनी पंढरपूर येथे प्रसिध्दी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक राहुल बोरे,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे,पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, पंढरपूर शहर युवा अध्यक्ष वसीम बेदरेकर , शहर महासचिव सुनिल दंदाडे,शहर उपाध्यक्ष आप्पासाहेब वाळखे, शहर सचिव विकास बंगाळे, दत्ता थोरात, बाळू आधटराव, संतोष आगवणे तसेच सोलापूर जिल्हा,पंढरपूर तालुका व पंढरपूर शहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पैलवान सादिक पठाण म्हणाले की, मी पैलवान होण्यासाठी खुप खडतर परिस्थितीतून मार्ग काढला आहे. माझ्या वाट्याला जो संघर्ष आला तसा संघर्ष पैलवान होऊ इच्छिणार्‍या इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तळागाळातील सर्वसामान्यांसाठी काम करणार्‍या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब पैलवानांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना चांगल्या तालमीत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन.चांगली व्यवस्था होत नसल्यामुळे गरीब घरातील पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन होऊ शकत नाही, महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाहीत त्यांची स्वप्न अपुरीच राहतात अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.यासाठी व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वाढीसाठी मी प्रयत्नशील राहीन असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *