राजकीय न्यूज

पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार निवेदन – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ८ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री दगडूशेठ हलवाई मंदिरात महाआरतीचे आयोजन

पुणे दि.३१ जानेवारी २०२४: पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आज पुणे येथील शिवसेना भवन येथे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार सहकाऱ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख आणि प्रमोद भानगीरे, शिवसेना महिला पुणे शहर प्रमुख पूजा रावेतकर, सुधीर कुरूमकर, शिवसेना महिला पुणे जिल्हाप्रमुख कांता पांढरे, ॲड. गितांजली ढोणे,सारिका पवार, सीमा कल्याणकर,रंजना कुलकर्णी, शिवसेना पुणे जिल्हा महिला समन्वयक शर्मिला येवले यांच्यासह मान्यवर आणि शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं आहे. शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असून त्याठिकाणी असलेला राडारोडा,धूळ ताबडतोब हटवावी. मेट्रोच्या वतीने नेमण्यात आलेले वॉर्डन्सची संख्या वाढवली पाहिजे, त्यांना गणवेश दिला पाहिजे. स्थानिक प्रशासनाने शहरातील नव्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्याचा समावेश वाहतूक कोंडीच्या यादीत केला पाहिजे.

लवकरच पुणे जिल्हा नियोजन निधीला अंतिम स्वरूप मिळणार आहे.पुणे शहरासह ग्रामीणसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.दि. ८ फेब्रुवारी रोजी श्री दगडूशेठ हलवाई गणपती सकाळी ८ वा मंदिरात महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.८ व ९ फेब्रुवारी रोजी शहरात रूग्ण सेवा,ज्येष्ठांचे सत्कार इत्यादी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *