सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना Control corona infection in border talukas – Guardian Minister Dattatraya Bharane
  सोलापूर /शेळवे / संभाजी वाघुले, 17/07/ 2021 : सोलापूर जिल्ह्यास लागून असलेल्या सांगली, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. तेथील टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज नियोजन भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी ,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

     प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितल कुमार जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यालगत असलेल्या माळशिरस, सांगोला तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे सांगितले. यावर तेथील ट्रेसिंग वाढवा, त्या तालुक्यात गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्या, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बालकांची तपासणी तर कराच पण त्याचबरोबर पालकांचे लसीकरण प्राधान्याने करुन घ्या, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

  यानुसार 2492 दिव्यांग आणि 142 कुपोषित बालकांच्या पालकांना लसीकरण याबरोबरच गर्भवतींचे लसीकरण सुरू करण्यात आल्याचे  लसीकरण समन्वयक डॉ.अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले. 

   तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने औषधे, इंजेक्शन यांचा पुरेसा साठा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

  बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जावेद शेख, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत, महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: