General news

आपले वर्तन प्रेमळ व सामान्य असावे- प्रशिक्षिका सौ.संस्कृती सातपुते

आपले वर्तन प्रेमळ व सामान्य असावे- प्रशिक्षिका सौ.संस्कृती सातपुते

स्वेरीत आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षणाचे उदघाटन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- आपल्या समोरचा व्यक्ती संभाषण करताना कसाही असो परंतु आपण त्याच्या सोबत जर आत्मीयतेने, तन्मयतेने,भावनेने आणि प्रेमाने वर्तन केले तर समोरच्या व्यक्तीची मानसिकता बदलू शकते. त्यामुळे आपसातील संबंध आणखी मजबूत होतात. कालांतराने आपल्याला सहज, मजेत घेणारा व्यक्ती पुढे आपल्याशी आत्मीयतेने वर्तन करत असल्याचे जाणवते कारण आपले अज्ञात शत्रू आपल्यावर नेहमी हल्ला करत असतात. अशावेळी आपण संयमाने, अभ्यासपूर्वक, प्रेमभाव व नम्रपणे वर्तन करावे. त्याचा पुढे सकारात्मक परिणाम जाणवतो. यासाठी आपले वर्तन नेहमी प्रेमळ व सामान्य असावे, असे प्रतिपादन रामसोल टेक आयटी कंपनीच्या डायरेक्टर व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका सौ.संस्कृती सातपुते यांनी केले.

गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम तथा एफडीपी अंतर्गत दि.२८ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आठवडाभर आर्ट ऑफ लिव्हिंग या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उदघाटनप्रसंगी माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी, रामसोल टेक आयटी कंपनीच्या डायरेक्टर, उर्जा फौंडेशनच्या अध्यक्षा, कवियत्री, लेखिका व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका सौ.संस्कृती सातपुते या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.प्रारंभी इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलना नंतर स्वेरीचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी स्वेरीच्या वाटचालीबाबत आणि त्यातून मिळालेल्या उत्तुंग यशाचा लेखाजोखा सादर केला.

पुढे बोलताना प्रशिक्षिका सौ. सातपुते म्हणाल्या की,स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये देखील नम्रपणा जाणवतो.सामाजिक उपक्रमात वेगवेगळे प्रयोग करताना केवळ अभियंतेच बाहेर पडत नाहीत तर देशाचे जबाबदार नागरिकही बाहेर पडत असतात. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य स्वेरी आत्मीयतेने करत असताना दिसते.स्वेरीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षण ठेवले आहे. डॉ. रोंगे सरांचा हा निर्णय स्वागतार्ह असून स्वेरी योग्य वेळी योग्य शिक्षण देत असते.

या आठ दिवसात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध अनुयायांकडून योगासने व आरोग्या बाबत मार्गदर्शन सत्र होणार आहे.सकाळच्या सत्रात विद्यार्थी व सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल सावे, प्रतिक खंडेलवाल,प्रेरणा खंडेलवाल यांच्यासह अनुयायी तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम.पवार,एफ.डी.पी.च्या समन्वयक प्रा.मिनल भोरे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ.एन.पी.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *