General newsState news

प्रवाशांची जिवीतहानी झाल्यास दोषी अधिकार्‍यांवर ३०२ चा गुन्हा नोंदवा- सुराज्य अभियान

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

प्रवाशांची जिवीतहानी झाल्यास दोषी अधिकार्‍यांवर ३०२ चा गुन्हा नोंदवा- सुराज्य अभियान

रायगड /ज्ञानप्रवाह न्यूज,दि १.२.२०२४ – राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगडमधील पेन-खोपोली महामार्गांवरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे.काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्री जाणारी कार पुलावरून खाली पडली.सुदैवाने गाडीतील प्रवासी वाचले; परंतु भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास आणि त्यामध्ये कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण ? पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आली आहे. या पुलाच्या निकृष्ट कामाविषयी सुराज्य अभियानाकडून थेट मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रमांसह) एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे,अशी माहिती सुराज्य अभियान समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

भोगावती नदीवरील पुलावरून जाणारा हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून या पुलावरील लोखंडी रेलिंगचे काम करण्यात आले. पुलाच्या डागडुजीसाठी ३५ लाख रुपये खर्चही करण्यात आले; मात्र त्यानंतरही पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचेच हे द्योतक आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. सद्यस्थितीत हा पूल धोकादायक आहे. वर्ष २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातच महाड येथे सावित्री नदीवरील पुलावरून एस्.टी.ची बस नदीत कोसळून ४० नागरिकांचा मृत्यू झाला होता. भोगवती नदीच्या पुलावर पुन्हा अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक लेखापरीक्षा) करून तातडीने दुरुस्ती करावी.पुलाचे काम होईपर्यंतच्या कालावधीत दुर्घटना घडून कुणाचा अपमृत्यू झाल्यास त्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा अर्थात् भा.दं.वि.संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा,अशी मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आली असल्याचे अभिषेक मुरुकटे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *