General news

मराठी संस्कृतीच्या संवर्धनात मॉरिशस येथील मराठी माणसांचे कार्य कौतुकास्पद –प्रो.डॉ.मधुमती कुंजूल

मराठी संस्कृतीच्या संवर्धनात मॉरिशस येथील मराठी माणसांचे कार्य कौतुकास्पद – प्रो.डॉ.मधुमती कुंजूल

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– मराठी माणसाने भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी साता समुद्रापार संघर्ष केला आहे. मॉरिशसमध्ये मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यात तेथील मराठी माणसांनी अतोनात प्रयत्न केले. सातारा, मालवण, पुणे या परिसरातील मॉरिशसला गेलेल्या पूर्वजांनी आपले धार्मिक ग्रंथ सोबत नेले. त्या ग्रंथांचे देव्हाऱ्यात पूजन केले जाते. महाशिवरात्री, गणपती महोत्सव, मराठी भाषा गौरव दिन असे सण-उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्राविषयी तेथील मराठी माणसांना खूपच आपुलकी आहे. हा जिव्हाळा आपण सर्वांनी जपला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून तेथील मराठी माणसांना लढण्याची प्रेरणा मिळाली,असे प्रतिपादन मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मधील मराठी अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. मधुमती कूंजूल यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात, रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘भाषा, साहित्य, संस्कृती: सहसंबंध व प्रभाव’ या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव,जे.बी. भायगुडे सर, उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता, डॉ. अनिल चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर म्हणाले की, मातृभाषा ही माणसाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. मातृभाषेतून मिळणारे ज्ञान आणि पटकन आत्मसात करित असतो. व्यक्तीमत्त्वाचा पाया पक्का होण्यासाठी मातृभाषेचे ज्ञान भक्कम हवे. म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्राधान्य दिलेले आहे. जागतिक स्तरातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपणास मराठी सोबत इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. मराठी माणसे जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवताना दिसतात.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की,साहित्य आणि समाज यामध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असते. साहित्यात वाच्यार्थ्यापेक्षा लक्षणार्थास अधिक महत्त्व असते. समाजाला नैतिक मूल्यांच्या आधारावर पुढे घेवून जाण्याचे कार्य संस्कृती करत असते. भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनात लेखक आणि वाचक यांची भूमिका महत्त्वाची असते. साहित्यातील अभिरुची सजग करण्याचे कार्य वाचक करतात. वाचक आणि लेखक यांच्यामुळे साहित्य चळवळ जिवंत राहते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की,जीवन समाधानी आणि आनंदी होण्यामध्ये साहित्य आणि संस्कृतीची भूमिका महत्त्वाची असते. रामायण आणि महाभारत या महाकाव्याने भारतीय संस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजच्या साहित्याचा पिंड या महाकाव्यावर पोसलेला आहे. चांगली भाषा वापरणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. श्रमाची प्रतिष्ठा आणि अहिंसा ही आदर्श मानवी मूल्ये आहेत. यांचे जतन होणे अपेक्षित आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.राजाराम राठोड यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.रमेश शिंदे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले.उपस्थितांचे आभार समन्वयक प्रा.डॉ.दत्ता डांगे यांनी मानले.या कार्यक्रमास हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या प्रा.डॉ. नम्रता बागडे, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील प्रा.डॉ.मनीषा नेसरकर,ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.महेंद्र कदम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील मराठी अभ्यास मंडळाचे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. शिवाजी हुसे, प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले, प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड, प्रा. डॉ. वामन जाधव, प्रा. डॉ. औदुंबर जाधव, प्रा. डॉ. रामचंद्र झाडे आदी मान्यवरांसह देशातील विविध राज्यातील विद्यापीठांमधून आलेले संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत संशोधक विद्यार्थ्यांचे आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे संशोधन पेपर सादर करण्यात येवून त्याच्यावर चर्चा करण्यात आली.

उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणात प्रा.डॉ.संजय चौधरी जेऊर, प्रथम, कु.सुवर्णा हजारे पंढरपूर द्वितीय आणि नरेश परब गोवा तृतीय, पोस्टर सादरीकरणात बाजीराव जांबेकर राजापूर प्रथम, सूर्यकांत आदलिंगे बार्शी द्वितीय क्रमांक आणि संतोष फटे तृतीय असे क्रमांक प्राप्त झाले. पुरस्कार प्राप्त संशोधकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हरिभजन कांबळे, डॉ. सुमीत साळुंखे,प्रा.डॉ.विनया पाटील,प्रा. योगेश पाठक, प्रा. डॉ. चंद्रकांत काळे, प्रा. रावसाहेब मोरे, प्रा. सचिन सोनकांबळे, प्रा. स्वप्नाली बळवंत,पर्यवेक्षक प्रा.युवराज आवताडे, प्रा.राजेंद्र मोरे,प्रा.महादेव जेधे, प्रा. डॉ. मधुकर अनंतकवळस, प्रभाकर पारधी, अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने, सुरेश मोहिते आदी शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *