मोकाट जनावरांबाबत दंडात्मक कारवाई करू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
मोकाट जनावरांबाबत दंडात्मक कारवाई करू – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर We will take punitive action against stray animals – Collector Dr.Vipin Itankar
नांदेड / जिमाका, दि. 21/07/2021 :- सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. पाळीव जनावरे बाहेर रस्त्यांवर मोकळी सोडल्यास अशा पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या.
प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची’ त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. मधुसुदन रत्नपारखी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.भुपेंद्र बोधनकर, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. एस. बी.खुणे, डॉ.प्रविणकुमार घुले,पशुधन विकास अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड,परिवहन कार्यालयाचे भोसले, अशासकीय सदस्य अतिंद्र कट्टी,सत्यवान गरुडकर यांच्यासह शासकीय, अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.
मनपा क्षेत्रात जनावरांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाही याबाबतची खबरदारी पशुपालकांनी घेतली पाहिजे.प्राणी क्लेश समितीने यासंदर्भात लक्ष देऊन अशी घटना घडत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले.वाहनांमध्ये मुक्या प्राणीमात्रांची दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला नागरिकांनी माहिती द्यावी.याबाबत वाहनधारकांवर तसेच पशूपालकावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या.