Uncategorized

जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन साजरा

महासंघाच्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करणार; कल्याण केंद्रासाठी निधी देणार

जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई दि. ७ – राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

महासंघाच्या कल्याण केंद्राच्या वांद्रे येथील जागेवर आयोजित वर्धापनदिन सोहळ्यास कोकणचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे, कल्याण केंद्र समन्वयक सुदाम टाव्हरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असून अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहेत. सरकार आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावली की विकास वेगाने होतो, याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे, अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्याचा लाभ जनतेला देण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यातून सरकारची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम हे अधिकारी करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे, त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी दावोस येथे करण्यात आलेल्या करारांपैकी ८० टक्के करार पूर्ण झाले आहेत. यंदा ३५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्नामध्येही राज्याचा मोठा वाटा आहे. हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करीत असल्याचे सांगून लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे, त्यांनी अधिकाधिक लोकांना भेटावे, जनतेला अधिकारी जितके भेटतील, तितके अधिक चांगले काम होईल, असा विश्वास व्यक्त करुन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्या लवकरच पूर्ण करु. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महासंघाचे अध्यक्ष श्री देसाई यांनी महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच आतापर्यंत केलेल्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *