पूरग्रस्त भागातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – पालकमंत्री सतेज पाटील

पूरग्रस्त भागातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – पालकमंत्री सतेज पाटील Citizens in flood affected areas should cooperate with the administration – Guardian Minister Satej Patil

कोल्हापूर,दि.23/07/2021/ जिल्हा माहिती कार्यालय : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पुराचा वेढा असणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथून एनडीआरएफची तिसरी टीम रवाना झाली.यावेळी आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील,करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर,तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच एनडीआरएफचे जवान उपस्थित होते.

     पूरग्रस्त प्रयाग चिखली,आंबेवाडी भागातील बहुतांशी नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून उर्वरित सर्व नागरिकांचे सुरक्षित स्थळी युद्धपातळीवर स्थलांतर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहेत. शहर व ग्रामीण भागातील पूरग्रस्तांचे प्रशासनाच्यावतीने स्थलांतर करण्यात येत आहे. शहरात देखील काही भागात पुराचे पाणी वाढत आहे. अशा वेळी पालकमंत्री सतेज पाटील नागरिकांच्या स्थलांतर व मदत कार्यात सहभागी झाले आहेत.महावीर कॉलेज जवळील डायमंड हॉस्पिटल तसेच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.पूरपरिस्थितीची पाहणी करुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला.डायमंड हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री श्री.पाटील स्वतः पुढे सरसावले आहेत.

  भर पावसात पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करणारे एनडीआरएफचे जवान व स्वयंसेवकांच्या कामाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केले. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास पूरग्रस्तांचे तात्काळ स्थलांतर व मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या आणखी 4 टीमची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 टीम काल दुपारी तर आज आणखी एक टीम दाखल झाली असून आणखी 4 टीम आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.प्रत्येकी एका टीममध्ये 3 बोटी, 3 अधिकारी, 25 जवान आहेत.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – पालकमंत्री सतेज पाटील

जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सन २०१९ साली आलेल्या पुरापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पूराचे पाणी आपल्या घरापर्यंत येण्यापूर्वीच स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.जिल्ह्यातील जनतेने विशेषत: पूरग्रस्त भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले,सन २०१९ साली राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ५५ फूट ६ इंच इतकी होती.शुक्रवारी सायंकाळी ही पाणी पातळी जवळपास ५४ फूट इतकी झाली आहे. उद्याही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

पुढचे ४८ तास कोल्हापुरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क रहावे.पूर पाहण्यासाठी शहरातील लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. या आपत्‍कालीन परिस्थितीत मानवतावाद जोपासावा त्याचबरोबर प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे,असे आवाहन पालकमंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: