२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने विशेष प्रासंगिक लेख….

प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ.सुनील दादा पाटील Experimental personality Dr. Sunil Dada Patil

 प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असली की,व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतो.आकाशालाही गवसणी घालू शकतो. कितीही प्रतिकूल वादळे आली तरी त्यांच्यावर मात करतो.अगदी असेच साहसी,विनयी आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.सुनील दादा पाटील.

 यशाची हवा डोक्यात जाऊ न देता ते जमिनीवर आहेत.ज्या प्रतिकूल परिस्थितीतून आपण आलो त्याची जाण ठेवत त्यांचे विविधांगी प्रयोगशील कार्य सुरू आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर पट्ट्यात डॉ.सुनील दादा पाटील वेगाने त्यांचे काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य सद्या जयसिंगपूर,तालुका शिरोळ,जिल्हा कोल्हापूर येथे आहे.त्यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील जामगाव,तालुका मेहेकर आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले.शालेय शिक्षण मेहेकरला तर हैद्राबाद येथून त्यांनी इतिहास विषयात आचार्य पदवी मिळविली.

 खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर पाचगणी व महाबळेश्वर येथे ते बरेच काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते तर जयसिंगपूर येथे प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा बजावली.नोकरीनिमित्त त्यांची बरीच भटकंती झाली आणि आयुष्य समृद्ध झाले. आता जयसिंगपूर येथे ते मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय करतात.

   डॉ.सुनील पाटील यांचे बालपण अतिशय कष्टात गेले.मेहेकर शहरातील डॉ.डी.एम.चांगाडे आणि डॉ.नंदकुमार नहार यांच्या दवाखान्यात शालेय जीवनात त्यांनी कंपाउंडरचे काम केल्याचे तसेच वेळप्रसंगी इतरांच्या शेतीवर मोल-मजूरी केल्याचीही त्यांना आठवण आहे. घरी थोडी-फार शेती असली तरी ती शाश्वतीची नव्हती म्हणून त्यांची पावले शिक्षणाकडे वळली.वाचनाने त्यांना आत्मभान दिले.शालेय जीवनातच त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यातूनच त्यांची प्रतिभा बहरली आणि त्यांना लिहिण्याचा छंद जडला.

 आज त्याच्या वैयक्तिक ग्रंथालयात १५ हजारां हून जास्त पुस्तके आहेत. विशेष म्हणजे त्यात तीन हजार मराठी कवितासंग्रह आणि पाच हजारपेक्षा जास्त दिवाळी अंक आहेत.प्रकाशन संस्थेच्या पुस्तकासाठी तर स्वतंत्र गोडावूनच आहे. 

 कोल्हापूर परिसरात छोट्या-छोट्या गावांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ प्रदर्शने आणि साहित्य संमेलने भरविली आहेत.तीन वर्षात १६० पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या कवितासागर पब्लिशिंग हाउसच्या नावावर आहे. आज वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षात असताना त्यांच्या नावावर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड,लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह एक डझनाहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये त्यांच्या कार्याची नोंद आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि संशोधनासाठी ‘कवितासागर साहित्य अकादमी’ ची त्यांनी स्थापना केली आहे. काही काळ त्यांनी ‘काव्यबहार’ हे त्रैमासिक आणि 'कवितासागर' नावाचे मासिक देखील चालविले. कवितासागर प्रकाशन,जयसिंगपूर यांच्यावतीने आजवर सातशेहून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.आत्मचरित्रे,संत साहित्य,जनरल नॉलेज,शेती,पर्यावरण,वैचारिक ग्रंथ यासह कथा व कवितांची अनेक दर्जेदार पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ या प्रकाशन क्षेत्रातील शिखर संस्थेने त्यांच्या कवितासागर प्रकाशन संस्थेस या वर्षी ‘बेस्ट पब्लिकेशन’चा पुरस्कार जाहीर केला आहे.

  वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी त्यांनी सांगली आणि कोल्हापूर येथील कारागृहात केलेल्या प्रबोधनामुळे कैदीदेखील वाचनाकडे वळले.अनेक कैदी लिहू लागले.कैद्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी देखील डॉ.सुनील दादा पाटील यांनी घेतली.त्यातून काही कैद्यांची पुस्तके देखील त्यांनी स्वखर्चाने प्रकाशित केली.विशेष म्हणजे कैद्यांचे वाचनविश्व वाढावे यासाठी त्यांनी आजवर जवळपास तीन हजार पुस्तके कारागृहा तील ग्रंथालयाला भेट स्वरुपात दिली आहेत. बरेचसे कैदी त्यांची शिक्षा समाप्त झाल्यानंतर घरी जाण्याआधी त्यांना भेटायला येतात.तुम्ही दिलेल्या पुस्तकांच्या वाचनाने माझे आयुष्य बदलले असे आवर्जून सांगतात.दोन वर्षापूर्वी सांगली कारागृहा तील एका कैद्याच्या कथा त्यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक दिवाळी अंकात छापून आणल्या होत्या. 

  मुलांसाठी त्यांनी बाल वाचनालय सुरू केले आहे. याशिवाय वर्ष २००९ पासून त्यांनी वाचन संस्कृती वाढावी यासाठी अभिनव 'मोफत पोस्टल लायब्ररी' हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी अनेक दात्यांकडून जुनी-नवी पुस्तके मिळविली आहेत.त्यात स्वत:च्या काही पुस्तकाची भर घालून ही पुस्तके मागेल त्याला टपाल खर्चाची झळ सोसून ते मोफत पाठवतात. या पुस्तकासोबत पुरेसे तिकीट लावलेले परतीचे पाकिटही पाठवतात. वाचकाने पुस्तक वाचून झाल्यावर पाकिटात टाकून ते फक्त पोस्टाच्या पेटीत टाकण्याची तसदी घ्यायची. या पद्धतीने प्रथम फेरीत एकदा वाचकाने पुस्तक वाचून परत केले की, त्या वाचकाचे संगणकावर लायब्ररी कार्ड तयार होते. पोस्टल लायब्ररीचे अशाप्रकारे मोफत सदस्य होता येते. वाचकांना पोस्टाने पुस्तके येत राहतात.

  एखाद्या वाचकाला एखादे पुस्तक खूप आवडले आणि ते त्यास ठेवून घ्यायचे असेल तर तसेही करता येते. अशावेळी मात्र त्या पुस्तकाच्या किंमती एवढे स्वत:कडील कोणतेही एक पुस्तक वाचकाने पाकिटात टाकून परत पाठवायचे ही अट आहे.मात्र पुस्तक परत न पाठवता गहाळ केले की, पुस्तक पुरवठा थांबतो,सदस्यता आपोआपच रद्द होते. या अभिनव उपक्रमाविषयी विचारले असता डॉ.सुनील दादा पाटील म्हणाले की, लोकांची वाचनाची अभिरुची कमी होत चालली आहे. लिहिणाऱ्यांच्या घरातही वाचणारे नाहीत. ग्रंथागारे ओस पडली आहेत.ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती ग्रंथालयात जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही साडेबाराशे लोकांना पोस्टाद्वारे नियमित मोफत ग्रंथ पुरवठा करीत आहोत. चांगल्या आचारासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते आणि चांगल्या विचारांसाठी चांगल्या वाचनाची आवश्यकता असते.यासाठी बालक असो की,पालक दोघांनाही वाचनाची आवड असावी.आज टी.व्ही.,कॉम्प्युटर आणि मोबाईलमुळे लोकांचे वाचन कमी झाले आहे. कोणाच्याही दिवाणखान्यात गेल्यावर समोर टी. व्ही.आणि टिपॉयवर रिमोट दिसतो. मात्र त्याच ठिकाणी जर पुस्तके असतील तर अल्प-स्वल्प कामासाठी आलेली व्यक्तीही सहज पुस्तके चाळतील,वाचतील तर पुस्तकाच्या प्रेमात पडतील.घरामध्ये टी.व्ही.चा रिमोट जितका सहज दिसतो.तितकी सहज पुस्तके दिसली पाहिजेत तरच लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.” असेही ते आवर्जून सांगतात.

  डॉ. सुनील दादा पाटील यांचे काम नक्कीच 'आश्वासक' या सदरात मोडणारे आहे. लोकांना पुस्तकाशी जोडणारे आहे. पुस्तके मस्तक सशक्त करतात. मस्तक सशक्त असले की, ते कधीही कुणाचे हस्तक होत नाही. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून घडत असतं. डॉ.सुनील दादा पाटील यांचे या प्रयोगशील कार्याबद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन!

(वाचकांसाठी डॉ. सुनील दादा पाटील यांचा मो. क्र.९९७५८७३५६९)

 • रविंद्र साळवे,(बुलढाणा),मो.9822262003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *