रमाई आवास योजनेसाठी पुणे येथील समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करा Submit application for Social Welfare Department at Pune for Ramai Awas Yojana
पंढरपूर ,३०/०७/२०२१ - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (महानगरपालिका क्षेत्र)अशी वैयक्तिक घरकुलाची योजना राबविण्यात येते.पुणे शहारातील गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा या हेतुने अर्जदारांनी रमाई आवास योजनेसाठी तात्काळ अर्ज सादर करावेत,असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.
त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,रमाई आवास योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका, पुणे येथे संपुर्ण कागदपत्रे सादर न केलेले यापुर्वीचे सर्व अर्ज दप्तरी जमा करण्यात येत असून सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रमाई आवास योजनेचा लाभ मिळणे करिता लाभार्थ्यांनी पुणे महानगरपालिका पुणे येथे संपर्क साधून नव्याने अर्ज सादर करावेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेला जातीचा दाखला, महाराष्ट्र अधिवास दाखला,वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत मर्यादित असलेला दाखला,रेशनकार्ड,अर्जदार यांच्या नावे ३०चौ.मी.घरकुल बांधकामासाठी मोकळी जागा किंवा कच्चे घर असावे.तसेच महानगरपालिका यांनी दिलेला बांधकाम परवाना, शासन निर्णयाप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहीत नमुन्यातील अर्ज तात्काळ महानगरपालिका पुणे/पिंपरी-चिंचवड महानगर पालिकाकडे सादर करावेत.याबाबत काही अडचण असल्यास महानगरपालिका पुणे/पिंपरी-चिंचवड महानगरपालिका / सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, सामान्य नागरिकांना काहीच समजले नाही तर समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमंती संगिता डावखर यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.