खर्डीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ?
खर्डीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ?Inferior road work in Khardi?
खर्डी,अमोल कुलकर्णी,25/04/2021- पंढरपूर तालुक्यातील खर्डी हे ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. गावातील महादेव मंदिर ते पाण्याच्या टाकी पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे यापूर्वी हा रस्ता सिमेंट मध्ये तयार केला होता. भूमिगत गटारीसाठी हा रस्ता उखडून पुन्हा त्यावर सिमेंटने बांधणी करण्याचे वेगळे कंत्राट दिले गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीची पाच वर्षांची मर्यादा पूर्ण होतानाच या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू असताना गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले.अगदी दुर्दैव म्हणजे भर रस्त्यातून जाणारे येणाऱ्या वाटसरूना हा वळणातील अपूर्ण चेंबर लक्षात न येण्याने अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.यात रोड लाईट ही नसल्याने रात्री अनेक परगावचे प्रवासी इथे वाहनासह जखमी झाले आहेत. तसेच रस्त्यामध्ये येणारे अनेक भूमिगत गटारीचे चेंबर्स अपूर्ण अवस्थेत ठेवून काम पूर्ण झाल्याचे सांगितले. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता “हे काम पूर्ण झाले असून माझा त्या चेंबरचा काही संबंध नाही कोरोना मुळे अजून बिल उचलले नाही “अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.याबाबत विद्यमान सरपंचांना समोर उभा राहून या कामाच्या गुणवत्तेबाबत विचारले असता त्यांनी हे काम मागील बॉडी ने मंजूर केल्याचे सांगितले.
मागील सरपंच रमेश हाके यांना विचारले असता अजून यावर दोन थर येणार असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे खर्डीतील या मध्यवस्तीतील मुख्य रस्त्याचे सोळा लाख रुपयांचे कंत्राट कोणी दिले ? आणि गुणवत्ताहीन रस्त्याच्या कामात कोण कोण सामील आहे ? याबाबत चर्चा सुरू आहे.मुख्य रस्ता असल्याने हे काम उत्तम दर्जाचे होण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून केली जात आहे.