मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरी बाहेरचे उपाय शोधा – उपराष्ट्रपतींचे वैज्ञानिकांना आवाहन
उपराष्ट्रपतींची बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राला (JNCASR) भेट Find out-of-the-box solutions to the challenges facing mankind – Vice President appeals to scientists
नवी दिल्ली,16 ऑगस्ट 2021,PIB Mumbai-
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिकांना हवामान बदल, कृषी, आरोग्य आणि औषध क्षेत्रात मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे उपाय शोधण्याचे आवाहन केले.
बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (JNCASR) येथे वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्या साठी नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले.
300 पेक्षा जास्त पेटंट तयार केल्याबद्दल आणि स्वदेशी शोधांवर आधारित स्टार्टअपच्या स्थापनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल जेएनसीएएसआरचे त्यांनी कौतुक केले.
मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे उपाय शोधा
जेएनसीएएसआर विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी ओळखले जातात असे नमूद करत वैज्ञानिक आणि संशोधकांना सिंथेटिक जीवशास्त्र, संगणकीय जीवशास्त्र,उच्च कार्यक्षमता अभियांत्रिकी साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रात संशोधन करण्याचा सल्ला दिला. उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना शेतकरी समुदायाला भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली.
प्रख्यात वैज्ञानिक सीएनआर राव यांचा केला सत्कार – ते युवा वैज्ञानिकांसाठी प्रेरणास्थान
जेएनसीएएसआरने उत्कृष्ट संस्थांमध्ये स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रभाव पाडल्याबद्दल त्याची प्रशंसा करताना ते म्हणाले की, देशात वैज्ञानिक वृत्तीला चालना देण्यासाठी आणि संशोधनाचे परिणाम सुधारण्यासाठी ही संस्था मोठे योगदान देऊ शकते. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार, 2020 साठी नामांकन मिळालेले प्रख्यात वैज्ञानिक प्रा.सी एन आर राव यांचे अभिनंदन करून त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील तरुण वैज्ञानिकांना सतत प्रेरणा दिल्याबद्दल त्यांची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रख्यात वैज्ञानिक प्रा.सीएनआर राव,जेएनसीएएसआरचे अध्यक्ष,प्रा.जी.यू. कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.