महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास केली सुरूवात

महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास केली सुरूवात Department of Women and Child Development has started implementing Nandurbar pattern across the state

  मुंबई,दि.23 /महासंवाद :- कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरूवात केली असून दि. ३१ ऑगस्टपर्यंत तीव्र (मॅम) आणि अतितीव्र (सॅम) कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जाणार आहे.या शोधमोहिमेत आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर योग्य उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. राज्यात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी विभाग संपूर्ण क्षमतेने काम करील, असेही त्या म्हणाल्या.

  बालकांमधील कुपोषणाच्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती येथून घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत गर्भवती महिला,स्तनदा माता, किशोर वयीन मुली तसंच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. या मोहिमेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका , आरोग्यसेवक यांचा समावेश असणार आहे. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या सहाय्याने नियोजन बद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, कुपोषण आणि मातांचे समुपदेशन करण्यासाठी ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य आणि महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी करण्यात येणार आहे. इतर दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांना सुव्यवस्थित पद्धतीने संदर्भ सेवा मिळवून देण्याचाही या मोहिमेचा उद्देश आहे.

 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक,गरोदर महिला आणि स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी,लसीकरण पूर्ण करण्याचेही उद्दीष्ट या पथकांना देण्यात आलेले आहे. या मोहीमेद्वारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात विभागाला यश येईल, असा विश्वास ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. या आरोग्य तपासणीमध्ये सॅम आणि मॅम श्रेणीत आढळणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात यावे, तसेच त्यांना ई.डी.एन.एफ.पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशा सूचना महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

  एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त रुबल अग्रवाल या मोहिमेबाबत आशावादी असून त्या म्हणतात, गेल्या वर्षी अशा मोहीमेमुळे आम्ही कित्येक बालकांचे, त्यांच्या मातांचे जीव वाचवू शकलो तसेच त्यांना कुपोषणातून बाहेर काढू शकलो. प्रत्येक जीव महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही या सर्व प्रकाराला आकड्यांमध्ये पाहत नाही, तर जीवनरक्षणाची मोहीम म्हणून पाहत आहोत.या शोधमोहिमेच्या माध्यमातून सापडलेल्या तीव्र आणि अतीतीव्र कुपोषित बालकांना योग्य उपचार दिले जातील. पूरक पोषण आहाराचा पुरवठा अबाधित कसा राहिल यावर विभागाने लक्ष पुरवले आहे. कोविड तसेच पावसाळ्यामुळे जर कुठल्या भागात अशी समस्या असेल तर या शोधमोहीमेत त्याचा शोध घेऊन उपाययोजना केल्या जातील, असेही श्रीमती अग्रवाल म्हणाल्या.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: