सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या मार्केटिंगचे प्रयत्न – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या मार्केटिंगचे प्रयत्न – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर Efforts for marketing of goods produced in Solapur district – Collector Milind Shambharkar
  शेळवे,संभाजी वाघुले / जिमाका :- आपल्या जिल्ह्यात विविध वस्तू, पदार्थ आणि फळांचे  मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यातील सोलापूर चादर, टेरी टॉवेल आणि डाळिंबाला जीआय मानांकने प्राप्त झाली आहेत.आता या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासन उत्पादकांच्या पाठिशी आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिला .

   केगाव येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात पोस्ट विभागामार्फत आयोजित डाळिंब, चादर, टेरी टॉवेलच्या विशेष आवरणाच्या अनावरण कार्यक्रमात श्री.शंभरकर बोलत होते. यावेळी पुणे विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल श्रीमती जी. मधुमिता दास, डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे, अखिल डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव काटे, टेक्स्टाईल विकास फाऊंडेशनचे चेअरमन श्रीनिवास बुरा, पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक ए.व्यंकटेश्वर रेड्डी, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ.देवेंद्रनाथ मिश्रा आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उत्पादनाच्या मार्केटींग आणि प्रतिमा निर्मितीसाठी पोस्ट विभागाची नक्कीच मदत होणार आहे असे सांगून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले ,जिल्ह्यात 25 हजार पॉवर लूम्स आहेत. वर्षाला 54 हजार टन विविध वस्त्र निर्मितीचे उत्पादन होत आहे.चादर आणि टॉवेलची निर्यात युरोप, आखाती देशात होत असल्याने सोलापूरच्या चादरीचा प्रसार जगभर होऊ लागला आहे.उत्पादकांना विविध सुविधा देऊन प्रशासना तर्फे मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले.

राज्याच्या 90 टक्के डाळिंबाचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. सोलापूरच्या डाळिंबाला जीआय हे जागतिक मानांकन मिळाले आहे. यामुळे सोलापूर डाळिंबाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे. युरोप, आखाती देशात सोलापूरचे डाळिंब सरस ठरत आहे, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे,असे सांगून श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यात 47 हजार 376 हेक्टर क्षेत्रावर भगवा, आरक्ता, मृदूला, ढोलका, गणेश, रुबी या जातीच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. 2019-20 या वर्षी सोलापूर जिल्ह्यातून 25 हजार 392 मे.टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. यातून शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले असल्याची माहितीही श्री.शंभरकर यांनी दिली.

   सांगोला आणि पंढरपूर तालुक्यात डाळिंबाचे सर्वांत जास्त उत्पादन घेतले जात आहे. इतर तालुक्यातही उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने डाळिंबावरील रोगावर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा श्री.शंभरकर यांनी व्यक्त केली.

     श्रीमती दास म्हणाल्या, सध्या पोस्ट विभाग नुसतीच पत्राची देवाण-घेवाण करत नसून विमा, बचत बँक, मनीऑर्डर, बँक, आधारकार्ड, पासपोर्ट या सुविधाही नागरिकांना देत आहे. प्रॉफिटऐवजी जनतेच्या भलाईचा विचार पोस्ट करीत आहे. पोस्टात जाण्याऐवजी तुम्ही घरबसल्या पैसे काढू शकता, भरू शकता आणि पाठवू शकता. कोणत्याही बँकेची सुविधा पोस्टाने तयार केली आहे. पोस्टमन तुम्हाला घरबसल्या या सेवा उपलब्ध करून देणार आहे. विशेष आवरणाच्या प्रसिद्धीमुळे कलाकार, कुशल कामगार, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यास मदत होणार आहे.पोस्टाच्या योजना जनतेच्या सेवेसाठी असून मोबाईल ॲप द्वारेही अनेक सुविधा घेता येऊ लागल्या आहेत. मुश्किलमध्येही पोस्ट जनतेच्या सेवेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोस्ट खात्याने डाळिंबाच्या जागतिक मानांकनाची दखल घेतली आहे.पोस्टाच्या तिकिटावर सोलापूरच्या डाळिंबाला स्थान देऊन नावारूपाला आणले आहे. डाळिंबाच्या वाहतूक व मार्केटिंगची अडचण दूर झाली असून देशाला परकीय चलन मिळवून देण्यात डाळिंब संघ पुढाकार घेईल, असे श्री.काटे यांनी सांगितले.

यावेळी श्री.मराठे, श्री.बुरा यांचीही भाषणे झाली. श्री.रेड्डी यांनी प्रास्ताविक केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सोलापूरच्या डाळिंब, चादर आणि टेरी टॉवेलच्या विशेष आवरणाचे (स्पेशल कव्हर) मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. चादर आणि टेरी टॉवेलला 2005 मध्ये भौगोलिक संकेतांक (जीआय टॅग) तर डाळिंबाला 2016 मध्ये प्राप्त झाला आहे. यावेळी प्रभाकर चांदणे, श्री.गड्डम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: