‘सर हमको पढाई के लिए हिंमत दिजिए….’; मुख्यमंत्र्यांसमोर धीटपणे बोलणाऱ्या सोनूचा व्हिडिओ पाहिलात ?


पाटणा: गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर बिहारमधील एका लहान मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी नालंदा दौऱ्यावर गेले असतानाचा हा प्रसंग आहे. यावेळी नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी कल्याण विघा या खेड्यातील एका शाळेत जनता दरबार भरवला होता. हा दौरा नेहमीप्रमाणे सरकारी सोपस्कार ठरणार, असे वाटत होते. त्यावेळीच एका ११ वर्षांच्या मुलाने (Bihar Nalanda Boy) सर्वांदेखत धीटपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आम्हाला चांगले शिक्षण मिळत नसल्याची तक्रार त्याने मुख्यमंत्र्यांकडे केली. सरकारी शाळेत अतिशय खराब शिक्षण दिले जात आहे.शिक्षक काही शिकवत नाहीत. आम्हाला शिकण्यासाठी बळ द्या. मला शिक्षण देण्याची पालकांची ऐपत नाही, असे त्या मुलाने नितीश कुमार यांना सांगितले. या प्रकराने नितीश कुमार यांच्यादेखत सर्वचजण थोड्यावेळासाठी अचंबित झाले.

मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या मूलाचे नाव सोनू यादव (Sonu Bihar) असे आहे. सोनूने मुख्यमंत्र्यांसमोर फक्त शिक्षणच नव्हे तर दारुबंदीचा प्रश्नही मांडला. नितीश कुमार यांच्या काळात बिहारमध्ये दारुबंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. मात्र, या कायद्याचा कशाप्रकारे फज्जा उडाला आहे, याचे वास्तवच सोनूने नितीश कुमार यांच्यासमोर मांडले. माझे वडील दही विकतात आणि आलेले सारे पैसे दारुत घालवतात.मला मोठेपणी IAS किंवा IPS व्हायचे आहे.मी काय करू? मी मॉंटेसरी ते चौथीच्या मुलांच्या शिकवण्या घेऊन पैसे मिळवतो, असे सोनूने नितीश कुमार यांना सांगितले. सोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोनूने आपल्याला मोठं होऊन IAS व्हायचं असल्याचे सांगितले. आजवर आपल्याला अंगणवाडीत, शाळेत दहाच्या पुढे पाढेही शिकवले गेले नाहीत, आपण स्वत: पुढचे पाढे आणि इतर गोष्टी शिकल्याचे सोनूने सांगितले.

दारुविक्री रोखण्यासाठी सोनूने सांगितला प्लॅन

नितीश कुमार यांच्या शनिवारच्या दौऱ्यानंतर बिहारमध्ये सोनू रातोरात स्टार झाला आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्याच्याकडे जाऊन त्याची व्यथा जाणून घेतली. यावेळी अवघ्या ११ वर्षांच्या सोनूने बिहारमध्ये दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याचा प्लॅन सांगितला. लपुनछपून होणाऱ्या दारुविक्रीचा ड्रोनच्या सहाय्याने तपास लावणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही साध्या वेशातील पोलीस तैनात करा. सर्वठिकाणी राजरोसपणे दारु मिळते. तुम्हाला या समस्येकडे एक पोलीस कर्मचारी नव्हे तर IAS च्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. कारण याठिकाणी रायफलचं काम नाही, तर डोक्याचं काम आहे. जी व्यक्ती दारुविक्री किंवा खरेदी करताना सापडेल त्यांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा करा. तरच बिहारमधील दारुबंदी यशस्वी ठरेल, असे सोनूने सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: